Pimpri: इंधन दरवाढ व महागाई विरोधात शहर कॉंग्रेसकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंधन दरवाढ व महागाई विरोधात शहर कॉंग्रेसकडून निषेध

पिंपरी : इंधन दरवाढ व महागाई विरोधात शहर कॉंग्रेसकडून निषेध

पिंपरी : इंधन दरवाढ व महागाई विरोधात शहर कॉंग्रेसने गुरुवारी (ता.२५) मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी भाजप व केंद्र सरकारविरुद्ध कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन अतिरिक्त तहसीलदार गीता गायकवाड यांना दिले.

आकुर्डी येथील म्हाळसाकांत चौकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यात कदम यांच्यासह माजी महापौर कविचंद भाट, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, माजी नगरसेवक विश्वास गजरमल आदी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध सभा झाली. त्यात कदम म्हणाले, ‘‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन कॉंग्रेसने देशाचा विकास केला आहे. आता देश भकास करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब निर्णय घेऊन, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.’’

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील सात वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशभरात महागाई आणि बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे देशातील बहुतांशी उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडलेले असताना एका रात्रीत हुकूमशाही पद्धतीने तुम्ही नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे देशातील छोट्या-मोठ्या सर्व उद्योग व्यवसायात आर्थिक मंदी आली आहे. त्याचा विपरीत परिणाम आता शेवटच्या घटकांपर्यंत जाणवू लागला आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागातील जनता देखील या महागाईमध्ये होरपळून निघाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजीच्या किमती रोजच वाढत आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, डाळी, तेल तसेच औषधे खरेदी करणे देखील गोरगरीब नागरिकांना कठीण होत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच वर्ग त्रस्त झाले आहेत. यात औद्योगिक क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

loading image
go to top