
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालये, हॉटेल, महाविद्यालये, संघटना व स्वयंसेवी संस्थांना कोविड केअर सेंटर 90 दिवसांच्या मुदतीसाठी चालवण्यास दिले होते.
पिंपरी : एकही रुग्ण नसताना कोविड केअर सेंटरचे बिल मंजूर का करायचे? त्याबाबतचा हिशेब द्यावा, यावरून गेल्या तीन आठवड्यापासून स्थायी समिती सभेत विषय तहकूब होता. त्यावर चर्चाही सुरू होती. अखेर, रुग्णांचे जेवण व औषधोपचाराचा खर्च वगळून उर्वरित रकमेच्या 65 टक्के खर्च देण्यास सोमवारी स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. दरम्यान, रुग्णालयांशी केलेल्या करारनाम्यानुसार, रक्कम दिल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालये, हॉटेल, महाविद्यालये, संघटना व स्वयंसेवी संस्थांना कोविड केअर सेंटर 90 दिवसांच्या मुदतीसाठी चालवण्यास दिले होते. बेडच्या संख्येनुसार त्यांना खर्च देण्याचे ठरले होते. मात्र, ऑक्टोबरपासून रुग्ण घटू लागल्याने टप्प्याटप्प्याने कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यांची 'अ', 'ब' आणि 'क' अशी वर्गवारी केली होती. 'अ' वर्गात सहा, 'ब' वर्गात 16 व 'क' वर्गात एक कोविड केअर सेंटर होते. 'अ' वर्गातील दोन सेंटर वापरातच आले नाहीत. त्यांची सुमारे साडेपाच कोटी रुपयांची बिले देण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यावर गेल्या तीन स्थायी समिती सभेत आक्षेप घेण्यात आला. अखेर त्यावर सोमवारी सादरीकरण घेण्यात आले आणि विषय मंजूर करण्यात आला.
अनेकांची स्वप्ने भुईसपाट; भोसरी रेडझोनमधील बांधकामांवर मोठी कारवाई
हर्डीकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "रुग्ण वाढत असल्याने दहा हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा सरकारचा आदेश होता. मात्र, आपल्या क्षमतेइतकेच सेंटर आपण तयार केली. त्यातील यंत्रणा व मनुष्यबळासाठी निविदा मागवल्या. वर्गवारी करून दर ठरवले. यंत्रणा तयार ठेवण्याचा आदेश दिला. मात्र, रुग्ण कमी होऊ लागल्याने व होमआयसोलेशनला परवानगी मिळाल्याने 'अ' दर्जाच्या दोन सेंटरमध्ये रुग्णच पाठवता आले नाहीत. मात्र, मनुष्यबळ, उपकरणे व अन्य साहित्य घेऊन त्यांनी गुंतवणूक केली आहे. करारानुसार त्यांचे पेमेंट देणे गरजेचे आहे. तत्पूर्वी चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यांच्या अहवालानुसार खर्च देण्याचा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवला होता. त्या समितीच्या भूमिकेवरही आक्षेप असल्याच त्यांचीही चौकशी केली जाईल.''
Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!
अशी दिली जाईल रक्कम
कोविड केअर सेंटरला प्रतिदिन प्रतिरुग्ण एक हजार 239 रुपये खर्च देण्याचे निश्चित केले होते. त्यात जेवणाचा खर्च 180 रुपये व वैद्यकीय खर्च 100 रुपये, असे 280 रुपये वजा करून उर्वरित रकमेच्या म्हणजेच 959 रुपयाच्या 65 टक्के अर्थात 623 रुपयांप्रमाणे बिल दिले जाणार आहे. आजपर्यंत संबंधितांना तीन कोटी 14 लाख एक हजार 900 रुपये दिले असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश बहल यांनी सांगितले. या विषयाचे लेखापरीक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.