कोरोनाविरोधात लढण्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रशासन सज्ज; 21 कोविड केअर सेंटर उभारणार

PCMC
PCMC

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लवकरात लवकर अधिकाधिक रुग्ण शोधून उपचार करण्यावर भर दिला आहे. सध्या महापालिका व खाजगी रुग्णालयांत मिळून चार हजार बेड उपलब्ध असून, ते पुरेसे आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत रुग्ण वाढीचा अंदाज पाहता आणखी बेडची व्यवस्था केली जात आहे. त्याअंतर्गत 8400 बेड क्षमतेचे किमान 21 कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सेवाभावी संस्था, अशासकीय संस्था, खाजगी रुग्णालये, संघटना किंवा वैद्यकीय संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पाॅझिटीव्ह रुग्ण संख्या सहा हजारावर गेली आहे. त्यापैकी सुमारे साडेतीन हजार रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अडीच हजार रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, तपासणीसाठी येणाऱ्या संशयितांची संख्याही वाढली आहे. ही संख्या आगामी काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अकरा कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. त्यात आता आणखी वाढ करण्यात येणार आहे. खाजगी संस्थांकडून पुढील तीन महिन्यांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार त्यात वाढ केली जाणार आहे. 

एक, बी, सी अशा तीन कॅटेगरीनुसार कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. ए कॅटेगरीसाठी रुग्णवाहिका, लॅब सर्विस व बायोमेडिकल वेस्ट अर्थात जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन सुविधा महापालिका पुरविणार आहे. सेंटर चालकांनी इमारत, अन्य पायाभूत सुविधा, पीपीई कीट, ग्लोज, आॅक्सीमीटर, थर्मोमीटर, एन95 व अन्य मास्क, शस्त्रक्रिया साहित्य, सानिटायझर, संगणक अशा सर्व सुविधा स्वत: उपलब्ध करून द्यायच्या आहेत. सी कॅटेगरीसाठीही या सुविधा संबंधित संस्थांनी उपलब्ध करायच्या आहेत. त्यांना फक्त लॅब सर्विस, बायोमेडिकल वेस्ट, टेलिफोन, वीज, पाणी, इंटरनेट, स्टेशनरी, मेडिसीन महापालिका पुरविणार आहे. मात्र, बी कॅटेगरीतील सेंटर साठी सर्व सुविधा महापालिका पुरविणार असून संबंधित संस्थांनी केवळ मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे. 

नव्याने उभारण्यात येणाऱ्या 21 कोविड केअर सेंटरसाठी 21मॅनेजर, 45 कन्सल्टंट, 318 डॉक्टर, 21 नर्सिंग इन्चार्ज, 350 स्टाफ नर्स, 21 फार्मासिस्ट, 330 वाॅर्डबाॅय किंवा आया, 402 सफाई कामगार, 30 संगणक किंवा डाटा एन्ट्री आॅपरेटर व 21 स्टोअर मॅनेजर असे 1599 अधिकारी, कर्मचारी मिळून मनुष्यबळ आवश्यक आहे. संबंधित संस्थांनी ते उपलब्ध करून द्यायचे आहे.

सद्य:स्थितीत सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे वसतिगृह मोशी प्राधिकरण, बालेवाडी स्पोर्टस् काॅम्लेक्स, सिम्बोयसीस हाॅस्टेल किवळे, पिंपरी चिंचवड काॅलेज आॅफ पाॅलटेक्निक हाॅस्टेल आकुर्डी प्राधिकरण, बीएसएनएल आरटीटीसी शाहूनगर, आदिवासी मुलींचे हाॅस्टेल मोशी प्राधिकरण, बालाजी लाॅ काॅलेज ताथवडे, म्हाडा प्रकल्प महाळुंगे, डी वाय पाटील गर्ल्स हॉस्टेल रावेत व बालनगरी भोसरी आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करता येतील, असे महापालिकेने सुचविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com