बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् तोही नांगरासकट - देवेंद्र फडणवीस

टाळगाव चिखली येथील बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कुर्ता-जॅकेट व पायजमामध्ये दिसले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Summary

टाळगाव चिखली येथील बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कुर्ता-जॅकेट व पायजमामध्ये दिसले.

पिंपरी-चिंचवड - टाळगाव चिखली येथील बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कुर्ता-जॅकेट व पायजमामध्ये दिसले. याबाबत मिश्कीलपणे ते म्हणाले, ‘आमदार महेश लांडगे यांनी खास बैलगाडा शर्यतीसाठी मला कपडे शिवून दिली व परिधान करायला लावली. शर्यतीत बैलांना झूल घालत नाहीत, कारण त्याला पळायचे असते. मात्र, मुख्य अतिथींना झूल घालून मिरवायला महेश लांडगे यांनी लावले’. तसेच ‘‘मुळशी पॅटर्नच्या डायलॉगप्रमाणे बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो आणि तोही नांगरासकट. हा नांगर कुणासाठी, तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर नितीन काळजे व माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. मंगळवारी (ता. ३१) शर्यतीची अंतिम फेरी पाहण्यासाठी फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र नारायणपूरचे प. पु. अण्णा माऊली महाराज, आमदार राहुल कुल, प्रसाद लाड, समाधान अवताडे, नितेश राणे, सुनील शेळके, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी आमदार नरेंद्र पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे, पंजाब बैलगाडा संघटनेचे निर्मल सिंग, हरियाणाचे पवन कुंडू आदी उपस्थित होते. दरम्यान, बैलगाडा संघटनेच्यावतीने महेश लांडगे यांचा सत्कार झाला.

यावेळी फडणवीस म्हणाले, बैलगाडा शर्यत बंद झाल्याने शेतकरी व गावगाड्याचे अतोनात नुकसान झाले. मात्र, आता हे नुकसान भरून निघालय. आम्ही सर्व जण जीवाची शर्त लावू पण यापुढे कधीही शर्यत बंद होऊ देणार नाही, त्यासाठी जे करावे लागेल ते करू. राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्याचे श्रेय आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आहे. ‘बैल पळू शकतो’ असा अहवाल आम्ही तयार केला. त्याला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली. अहोरात्र मेहनत घेवून महेश लांडगे यांनी मंत्रालय, सर्वोच्च न्यायालात परिश्रम घेतले. शर्यती सुरू होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी योगदान दिले''.

आमदार लांडगे म्हणाले की, शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतींचा आनंद घेता येतोय याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यांनी शर्यतीच्या खटल्याचा खर्च राज्य सरकार करेल, असा निर्णय घेतला. कायदा करण्यासाठी आम्ही विधानभवनावर बैलगाडा आंदोलन घेवून गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस स्वत: निवेदन स्वीकारायला आले. शर्यत सुरू करण्याबाबत तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर कायदा तयार केला. मात्र, या कायद्याला एकाने न्यायालयात आव्हान दिले. त्याच्या पाठिशी कोण होते? असा सवाल उपस्थित करीत केवळ फडणवीस यांना श्रेय मिळू नये. याकरिता काही लोकांनी राजकारण केले, अशी टीकाही महेश लांडगे यांनी केली.

पडळकरांना अडविणे निंदनीय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर निघाले असता पोलिसांनी त्यांना रोखले. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. तसेच अहिल्यादेवींच्या मार्गावर चालणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना अडविण्यात आले हे निंदनीय व चुकीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com