पिंपरी-चिंचवडमध्ये रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव 

rg.jpg
rg.jpg

पिंपरी : मंदिराला फुलांची सजावट, घरासमोर रांगोळी, दिवे प्रज्वलित करून पेढे, लाडू वाटप करीत फटाके फोडून अयोध्येतील रामजन्मभुमीच्या मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (ता. 5) साजरा करण्यात आला. यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते.

कोरोनामुळे एकत्रित येत कार्यक्रम सार्वजनिकरित्या करण्यास मनाई आहे. त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम घरातच टीव्हीवर "लाईव्ह' पाहण्यासाठी सकाळपासूनच टीव्हीपुढे हजेरी लावली होती. घरातील सदस्य सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सर्व घडामोडी थेट दाखविल्या जात असल्याने अनेकांनी घरातूनच प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेत "जय श्री राम' चा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. काही ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले. 
तसेच अनेक ठिकाणच्या श्री राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली होती. येथे सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिककिठाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाकाबंदीसह शहरात दिवसभर ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरू होती. तसेच काही जणांवर मंगळवारीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. यासह कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी काही जणांना 149 च्या नोटीसाही बजाविल्या होत्या. यामध्ये विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचाही समावेश होता. 

ऑनलाईन शुभेच्छा- कोरोनामुळे एकत्रित येऊन गर्दी करण्यास मनाई असल्याने एकमेकांना ऑनलाईनच शुभेच्छा देण्यात आल्या. दोन दिवसांपासूनच अनेकांच्या मोबाईलवर रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाचा डीपी पहायला मिळाला. तर काही ठिकाणी या कार्यक्रमाचे फलकही उभारण्यात आले होते. 

विश्‍व हिंदू परिषदेतर्फे शंखनाद-रांगोळ्यांच्या पायघड्या, सनईचे सूर, "जय श्रीराम'च्या नामघोष व शंखनाद करीत चिंचवडगावातील श्रीमोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात विश्व हिंदू परिषद चिंचवड शाखेतर्फे बुधवारी (ता.5) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्राचे विश्व हिंदू परिषद गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, चिंचवड विभाग मंत्री नितीन वाटकर, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत कोषाध्यक्ष महेंद्र देवी, जिल्हा मंत्री संजय शेळके, कार्याध्यक्ष धनाजी शिंदे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन वाटकर यांनी केले, तर महेंद्र देवी यांनी आभार मानले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमात हा कार्यक्रम पार पडला. 

व्हिडिओमधून  संघर्षाची गाथा-अयोध्येतील रामजन्मभुमी, तेथील मंदिर उभारणीसाठी झालेला संघर्ष, त्यासाठी दिलेले योगदान आदी मुद्यांवर आधारित एका गाण्याचा व्हिडिओ भाजप नेते राजेश पिल्ले यांच्या संकल्पनेतून बनविण्यात आला आहे. स्विकृत नगरसदस्या वैशाली खाडये-गोगावले यांनी हा व्हिडिओ तयार केला असून राम मंदिराच्या संघर्षाची गाथा तरुण पिढीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला आहे. या गाण्याला वैशाली खाडये व प्रबल मेहरोत्रा यांचा आवाज असून कोरस प्रणव पिल्ले, रुपेश बोरुडे, ऋतिक चव्हाण यांनी दिला आहे. तर या गीताची रचना, संगीत संयोजन पराग फडकर यांच्या स्टुडिओमध्ये झाले असून या गाण्यासाठी रुपेश बोरुडे यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com