esakal | पिंपरी चिंचवड : डास उत्पत्तिस्थानांचा शहराला धोका
sakal

बोलून बातमी शोधा

Mosquito

पिंपरी चिंचवड : डास उत्पत्तिस्थानांचा शहराला धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - थेरगावच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचे डेंगीमुळे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या अनुषंगाने महापालिका वैद्यकीय व आरोग्य विभाग (Medical and health Department) खडबडून जागे झाले. परिसरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी व सर्वेक्षण (Survey) सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी बुधवारी थेरगावसह शहरातील विविध भागांत पाहणी केली असता, अनेक ठिकाणी डासांची (Mosquito) उत्पत्तिस्थाने आढळून आली. यात भंगार साहित्य, साचलेली डबकी, उघड्यावर टाकलेला कचरा, पाण्याच्या उघड्या टाक्यांचा समावेश आहे. डासांची हीच उत्पत्तिस्थाने हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया अशा आजारांना निमंत्रण मिळत आहे. (Pimpri Chinchwad City Mosquito Breeding Grounds Threaten)

पावळ्यामध्ये हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया असे साथीचे आजार पसरू शकतात, या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे जनजागृती व उपाययोजना केल्या जात आहेत. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, अशा साथीच्या आजाराने एका नगरसेविकेचाच बळी गेल्याने महापालिका वैद्यकीय व आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळा सुरू झाला तेव्हापासून अर्थात गेल्या एक महिन्यात हिवतापाची लक्षणे असलेले एक हजार १९४ आणि डेंगीची लक्षणे असलेले ३९ रुग्ण शहरात आढळली आहेत.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेविकाचं डेंग्यूमुळे निधन, परिसरात हळहळ

डासांची उत्पत्ती व संसर्गमार्ग

एनॉफिलीस डासामुळे हिवताप आणि एडिस इजिप्ताय डासामुळे डेंगी व चिकुनगुनिया आजार पसरतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला चावलेले डास निरोगी माणसांना चावल्यास त्यांनाही हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया होतो. म्हणजेच एका व्यक्तीच्या रक्तातील विषाणू डासांमार्फत निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमण करतात. एनॉफिलीस डास अस्वच्छ पाण्यात, तर एडिस इजिप्ताय डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या पाण्यातच वाढतात. चार-पाच दिवसांनी त्यांचे कोष तयार होतात. ते कोष पाण्यातच जिवंत राहतात. कोषातून दोन दिवसांनी डास बाहेर पडतात.

अशी घ्या काळजी

डास निर्मूलनासाठी पाण्याचे ड्रम, टाक्या, भांडी आठवड्यातून एकदा कोरडी करावीत. त्यानंतर पुन्हा पाणी भरावे. यामुळे नजरेस न पडणारी अंडी व अळ्या मारल्या जातात. डबकी बुजवावीत. साचलेले पाणी वाहते करावे. घरातील पाण्याचे काही साठे, पूर्णपणे रिकामे करणे शक्‍य नसल्यास घट्ट झाकण लावावे.

हेही वाचा: पिंपरी : ‘कोरोनामुक्त’ शहर नसल्याने शाळा भरणार नाही

महापालिकेचे आवाहन

हिवताप, डेंगी व चिकुनगुनिया अशा आजारांचा संसर्ग डासांमुळे होतो. त्याला आळा घालण्यासाठी अंगण किंवा छतांवरील भंगार नष्ट करावेत. पाण्याची टाक्या, फ्लॉवर पॉट, कुलर, मनीप्लॅन्ट, फ्रिजचे ट्रे स्वच्छ करावीत, असे आवाहन वैद्यकीय व आरोग्य विभागाने केले आहे.

नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंगीने मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने थेरगाव व अन्य परिसरात वैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण व तपासणी सुरू केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत धुरीकरण व फवारणी केली जात आहे. पावसाळ्यात घ्यायची काळजी याबाबत जनजागृती सुरू आहे. बारणे यांच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयाकडून माहिती मागवली आहे.

- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका

loading image