esakal | Pimpri : निगडीत होणार भुयारी मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : निगडीत होणार भुयारी मार्ग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गाचे ६१ मीटर रुंदीकरण झाले आहे. त्यात निगडीतील भक्ती-शक्ती व टिळक चौक या अवघ्या पाऊण किलोमीटर अंतरावर दोन उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र, रुंदीकरणामुळे निगडीचे दोन भागात विभाजन होऊन बाजारपेठही विभागली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या समोरासमोरील दुकानात जायचे झाल्यास एक किलोमीटरचा वळसा पडत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही पुलांच्या मध्ये भुयारी मार्ग उभारावा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक व नगरसेवकांनी केली होती.

त्याबाबतच्या रेखांकनावर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोर चर्चा केली. नागरिकांची अडचण विचारात घेऊन ती सोडविण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला.

निगडीतील उड्डाणपुलामुळे व महामार्ग रुंदीकरणामुळे स्थानिकांचा अलीकडे-पलीकडे जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. गावठाणातील व प्राधिकरणातील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना अधिक त्रास होत आहे. शिवाय, शाळा, बँका, बाजारपेठा, पोलिस चौकी, पोलिस ठाणे, एसटी व पीएमपी बसस्थानकांवर जाणाऱ्या नागरिकांना वळसा घालावा लागत आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या नव्या स्ट्रेन 'सी.1.2' वर मंथन सुरू; सतर्क राहण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

त्यामुळे या मार्गावर भुयारी मार्ग उभारावा, अशी मागणी श्री खंडोबा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, उपाध्यक्ष केतूल सोनिगरा, कार्याध्यक्ष राजेंद्र काळभोर, सचिव राजूशेठ बाबर यांनी केली होती. त्यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक सचिन चिखले, अमित गावडे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका सुमन पवळे, शैलजा मोरे, कोमल घोलप, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर, राजेंद्र बाबर, सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे मागणीबाबत पाठपुरावा केला. त्याबाबत आयुक्तांसमवेत चर्चा झाली. त्यांनी भक्ती-शक्ती ते टिळक चौकातील उड्डाणपुलांदरम्यान भुयारी मार्ग उभारण्यास सहमती दर्शविली व त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाची उभारणी होणार आहे.

loading image
go to top