Pimpri News : शहराचे पिण्याचे पाणी ‘एमआयडीसी’ला नाही - उपमुख्यमंत्री फडणवीस

पिंपरी शहराच्या लोकसंख्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Summary

पिंपरी शहराच्या लोकसंख्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे.

पिंपरी - ‘शहराच्या लोकसंख्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. असे पाणी औद्योगिक क्षेत्राला दिले जाणार आहे. पुढील दोन वर्षांनी त्यांना पिण्याचे पाणी दिले जाणार नाही, असे नियोजन आहे,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प दोन ठिकाणी उभारले जात आहेत. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पिण्याचे पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सोबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्‍घाटन आणि विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यादरम्यान, प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका प्रशासक शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते. फडणवीस यांच्या हस्ते ग. दि. माडगूळकर यांच्या चौथ्या पिढीतील सुमित्र माडगूळकर व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नाट्यगृहातील गदिमा यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शहर वेगाने वाढताना पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रामुळे ३०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्त्वाचा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक भूसंपादनास विविध सहा विभागांच्या जमिनी आवश्यक आहे. त्यातील अडचणी दूर करा. एक महिन्यात भूसंपादन करून आवश्यक जमीन महापालिकेला द्या.’

प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘शैक्षणिक क्षेत्रातही महापालिकेने गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहे. शहरात आरोग्य सुविधेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व जिजाऊ क्लिनिक सुरू केले आहेत. देशातील सर्वांत स्वच्छ व सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आहे.’

‘गदिमां’च्या नावाने उंची वाढली

साहित्य संस्कृती क्षेत्रात ग. दि. माडगूळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मीकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली.

पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला. साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे. हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम महापालिकेने केले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

पवना धरणग्रस्तांसाठी १९ मे रोजी बैठक

कचरा प्रकल्प, रस्ते, सुरक्षा, स्वच्छता आदी विषयांवर प्रशासन काम करीत आहे. ते पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत १९ मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासमवेत बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

  • वर्षानुवर्षे साठवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक

  • महापालिका नवीन इमारतीसोबत काम करणारी माणसे संवेदनशील असावीत

  • चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणारे वातावरण असावे

  • सामान्य माणसाची कामे वेगाने होतील असे काम करायला हवे

  • पोलिस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि वाढीव मनुष्यबळ लवकरच

‘शिवनेरी जिल्हा करा’

खासदार बारणे व आमदार लांडगे यांनी २०१४ पासून झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. येत्या काळात कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यात येतील. मोशी येथे २०० खाटांचे कर्करोगाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कुस्ती, कबड्डी आणि ऑलिम्पिकसाठीचे प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून आमदार लांडगे यांनी ‘पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा करण्यात यावा,’ अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com