पिंपरी-चिंचवड : उपमहापौरांच्या राजीनाम्यानंतर महापौरही बदलणार?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

महापालिकेत कधी नव्हे, ती संधी मिळाली आणि सत्ताधारी भाजपने अधिकाधिक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदांवर संधी मिळविण्याचे धोरण स्वीकारले.

पिंपरी : महापालिकेत कधी नव्हे, ती संधी मिळाली आणि सत्ताधारी भाजपने अधिकाधिक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदांवर संधी मिळविण्याचे धोरण स्वीकारले. त्यात शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौरपदाचाही समावेश आहे. त्या जोडीला उपमहापौरपदही. त्यामुळे निश्‍चित कालावधी पूर्ण केल्यानंतर महापौर, उपमहापौरांना राजीनामा द्यावा लागणार, हे ठरलेलं आहे. मात्र, मुदत पूर्ण होण्यापूर्वीच तुषार हिंगे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला गेला आणि बदला-बदलीच्या चर्चेला उधाण आले. त्यामुळेच हिंगे यांचा राजीनामा मुदतीपूर्वीच घेतला, पण महापौर उषा ढोरे यांचा राजीनामा घेतला नाही. पुढील महिन्यात त्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलाची चर्चाही सुरू झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील पथारीवाल्यांचे सर्वेक्षण नोव्हेंबरमध्ये; खासगी संस्थेची नियुक्ती

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी उषा ढोरे व उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवड झाली होती. त्यापूर्वी भाजपची सत्ता महापालिकेत आल्यानंतर अर्थात फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीनंतर महापौरपदी विराजमान होण्याचा मान नितीन काळजे यांना मिळाला होता. त्या वेळी उपमहापौरपदी शैलेजा मोरे यांची निवड झालेली होती. साधारणतः सव्वा महिन्याचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि महापौर, उपमहापौरपदी अनुक्रमे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे यांना संधी मिळाली. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांना साधारणतः तीन महिन्याचा अधिक काळ मिळाला. मात्र, आचारसंहिता संपताच त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. आणि महापौरपदी ढोरे व उपमहापौरपदी हिंगे यांची वर्णी लागली. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल पुढील महिन्यात अर्थात 22 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. मात्र, त्यापूर्वीच गेल्या आठवड्यात हिंगे यांनी राजीनामा दिला. "पक्षाचा आदेश असल्याने राजीनामा दिला,'' असे त्यांनी सांगितले होते. मात्र, राजीनाम्याच्या कारणांबाबत वेगवेगळी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. अशीच चर्चा आता महापौर बदलाचीही सुरू झाली आहे. 

गृहमंत्र्यांनी केले पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कौतुक

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यापूर्वी किमान एक महिना अगोदर आचारसंहिता लागू होऊ शकते. म्हणजेच निवडणुकीसाठी अवघे चौदा महिने बाकी आहेत. विद्यमान महापौर ढोरे यांचा कालावधी पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे आगामी महापौरांना केवळ तेरा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. महापालिकेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी विकास कामांना गती देणारा व प्रशासनावर पकड मिळवू शकणारा नगरसेवकच महापौरपदी विराजमान होण्याची शक्‍यता आहे. भाजपच्या काळातील पहिले दोन महापौर भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक झाले होते. विद्यमान महापौर चिंचवड मतदारसंघातील आहेत. त्यामुळे आगामी महापौरसुद्धा चिंचवड मतदारसंघातीलच असतील, यात शंका नाही. पण, ती व्यक्ती कोण? यावरही आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad mayor will change after resignation of the deputy mayor