esakal | पिंपरी : गर्दी, गर्दी आणि फक्त गर्दीच!

बोलून बातमी शोधा

Mob

पिंपरी : गर्दी, गर्दी आणि फक्त गर्दीच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व त्यांची साखळी खंडित करण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दी टाळा, वारंवार हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा, असे महापालिका व पोलिस प्रशासन वारंवार सांगत आहे. मात्र, काही नागरिक ऐकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्याचे वास्तव बुधवारी (ता. २१) पिंपरी कॅम्पसह शहराच्या अन्य भागातही बघायला मिळाले. कारण, किराणा माल व भाजी खरेदीसाठी मुख्य बाजार व मंडईंमध्ये गर्दी होती.

कडक लॉकडाउनची शक्यता व दुकानांसाठी बदललेल्या वेळा यामुळे किरकोळ किराणा माल विक्रेत्यांसह नागरिकांनीही कॅम्पातील घाऊक विक्रेत्यांकडे गर्दी केली होती. चिंचवडगाव, सांगवी, भोसरी, कस्तुरी मार्केट, डांगे चौक, मोशी, चिखली, दापोडी परिसरातही हीच स्थिती होती. तसेच, मंडईंमध्येही गर्दी होती. बुधवारपासून सकाळी सात ते अकरा या वेळेतच किराणा दुकाने व मंडईत भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ किराणा दुकानदारांनी कॅम्पात गर्दी केली होती. रस्त्यातच वाहने उभी केल्याने चालणेही मुश्‍कील झाले होते.

हेही वाचा: ऑक्सिजन पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल; आयुक्त सौरभ राव यांची माहिती

किराणा दुकानदार राजेश परदेशी म्हणाले, ‘‘माझे मोशीत छोटे किराणा दुकान आहे. पिंपरीत सारखे सारखे येणे परवडत नाही. त्यात लॉकडाउनही होणार आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर टेम्पो घेऊन आलो आहे. पंधरा दिवस पुरेल इतका किराणा नेण्याचा विचार आहे. एरवी आवश्‍यक तितकाच माल नेत होतो.’’ माझा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. एकावेळी जास्त भाजीपाला नेला की तो खराब होतो. त्यामुळे फेकून द्यावा लागतो. त्यासाठी पिंपरी मंडईत रोज भाजीपाला घेण्यासाठी यावे लागते, असे लक्ष्मी मोरे यांनी सांगितले.

आयुक्त म्हणतात...

सर्व प्रकारची किराणा माल, भाजीपाला विक्रीची दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेले खाद्यपदार्थांची दुकाने, चिकन, मटण, मासे, अंडी विक्रीची दुकाने एक मेपर्यंत सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहणार आहेत. मात्र, नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. मात्र, घरपोच पार्सल सेवा सकाळी सात ते सायंकाळी सहा वेळेत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.