पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर होणार बंद; कारण ऐकून मिळेल दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

  • महापालिका प्रशासनाचा निर्णय
  • पहिल्या टप्प्यात पाच सेंटर बंद करणार 

पिंपरी : कोरोनामुक्तांची संख्या वाढत असून, नवीन रुग्णांची संख्या घटत आहे. तसेच, बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनचा (घरीच राहून उपचार) पर्याय निवडत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात रुग्णसंख्या आणखी कमी झाल्यास उर्वरित सेंटरही टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यास बंद केलेले सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. 

आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. दिवसाला बाराशे ते दीड हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रमातून घरोघरी तपासणी केली जात आहे. संशयितांच्या घशातील नमुने तपासण्यात येत आहेत. या उपक्रमात 25 लाख लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, गुरुवारपर्यंत (ता. 1) 15 लाखांवर नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात केवळ अडीचशे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. शिवाय, आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या 79 हजार रुग्णांपैकी 71 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जवळपास एक हजार 330 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडेसात हजारांपर्यंत सक्रिय रुग्ण असून, साडेचार हजार रुग्ण महापालिकेच्या, तसेच एक हजार रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. कोणतेही लक्षणे नसलेले दोन हजार रुग्ण होम आयसोलेट आहेत. त्यामुळे महापालिकेने 16 पैकी महाळुंगे म्हाडा वसाहत, इंदिरा कॉलेज ताथवडे, डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह, ईएसआय रुग्णालय चिंचवड, सिंबायोसिस कॉलेज किवळे येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

इथे आहेत कोविड सेंटर 

मागावसर्गीय मुलांचे वसतिगृह मोशी, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह मोशी, घरकुल इमारत क्रमांक डी पाच ते आठ, बी 10 व 12, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, बालेवाडी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, पीसीसीओपी वसतिगृह आकुर्डी, इन्फ्रास्ट्रक्‍चर लोकोटेड आणि हॉटेल क्रिस्टल कोर्ट आदी ठिकाणीही कोविड केअर सेंटर आहेत. 

अनेक रुग्ण होम आयसोलेशन होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांत किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे गरज नसलेले कोविड केअर सेंटर बंद करण्याचा विचार आहे. गरज पडल्यास ते पुन्हा सुरू करता येतील. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation closed covid center after corona patients decreased