esakal | भीमसृष्टीतील चुकांची अखेर दुरुस्ती; पिंपरी-चिंचवड महापालिकेला घ्यावी लागली दखल 
sakal

बोलून बातमी शोधा

भीमसृष्टीतील चुकांची अखेर दुरुस्ती; पिंपरी-चिंचवड महापालिकेला घ्यावी लागली दखल 
  • माहिती देणाऱ्या कोरीव पाट्या बदलल्या 

भीमसृष्टीतील चुकांची अखेर दुरुस्ती; पिंपरी-चिंचवड महापालिकेला घ्यावी लागली दखल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोसरी : महापालिकेने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेल्या भीमसृष्टीच्या उठाव शिल्पाच्या (म्युरल्स) माहितीपर कोरीव पाट्यांमध्ये काही छोट्या-मोठ्या चुकांबरोबर ऐतिहासिक घटनेविषयी चुकीच्या सणावळी दिल्या होत्या. याविषयी नागरी हक्क सुरक्षा समितीने चुकीची माहिती दुरुस्ती करण्यासाठीचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेने गेल्या आठवड्यात भीमसृष्टीतील एकूण एकोणीसपैकी तेरा माहितीपर पाट्या बदलल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसृष्टी उभारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून महानिर्वाण दिनापर्यंत माहिती सांगणारे एकूण 19 म्युरल्स या ठिकाणी बसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे म्युरल्सलगत ऐतिहासिक घटनेची माहिती देणारे माहितीपर कोरीव पाट्याही बसविल्या आहेत. या माहितीपर पाट्यांमध्ये ऐतिहासिक प्रसंग, घडामोडी, तारखा, सनावळी, संत-महापुरुष, विशेष व्यक्ती, संस्था यांचा उचित गौरव, पदवी-सन्मान, कालानुक्रमाने घटनाप्रसंग याचा सुसंगतपणे अर्थ लागत नसल्याच्या गंभीर चुका नागरी हक्क सुरक्षा समितीने महापालिकेच्या लक्षात आणून दिल्या. 19 पैकी 13 कोरीव माहितीपर पाट्यांमध्ये 16 चुका झाल्याचे पुराव्यानिशी समितीने महापालिकेकडे निवेदन दिले. त्या दुरुस्त करण्यासाठीही पाठपुरावा केला होता. या चुकांची महापालिकेने गांभीर्याने दखल घेतली. योग्य त्या दुरुस्त्या करून माहितीपर कोरीव पाट्या गेल्या आठवड्यात बसविल्याची माहिती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांबरोबरच नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

दरवर्षी आंदोलन छेडणार 

25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले होते. नेमका हाच प्रसंग भीमसृष्टीमध्ये जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप नागरी सुरक्षा समितीने केला आहे. मनुस्मृती दहन उठाव शिल्पाचा समावेश भीमसृष्टीमध्ये होत नाही, तोपर्यंत दरवर्षी 25 डिसेंबरला भीमसृष्टीसमोर मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन छेडण्याचा इशारा नागरी हक्क सुरक्षा समितीद्वारे देण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भीमसृष्टीला आंबेडकरी अनुयायी, विद्यार्थ्यांबरोबरच नागरिक भेट देतात. म्युरल्सजवळ दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे इतिहासाचा विपर्यास होण्याची शक्‍यता होती. काही शिल्पांमध्ये सणावळीच चुकविल्या होत्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली असती. महापालिकेद्वारे इतरही ठिकाणी ऐतिहासिक स्मारके उभारण्यात येत आहेत. या स्मारकामध्ये इतिहासाचा विपर्यास होईल, अशी माहिती महापालिकेने टाळली पाहिजे. 
- मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती