धक्कादायक! पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील शवागार 22 दिवसांपासून बंद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

  • मृतांच्या नातेवाइकांना होतोय मनस्ताप 

पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील शवागार (डेड हाऊस) गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

हार मानतील ते आयटीयन्स कसले; पाहा ते आता काय करतायेत

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची रेबीज लशीसाठी धावपळ 

शहरात सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सरासरी दररोज वीसपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच, इतर आजार, अपघातामुळेही मृत्यू होत आहेत. मात्र, काही प्रकारांत मृत्यूचे कारण कळण्यासाठी मरणोत्तर तपासणी करावी लागते. त्यासाठी डेड हाऊसमध्ये शीतगृह उभारले आहे. मात्र, तेथील शीतकरण यंत्रणा (कॉम्प्रेसर) बंद पडली आहे. त्यामुळे मृतदेह ठेवता येत नाही. अनेकदा मरणोत्तर तपासणी झाल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे मृतदेह शीतगृहात ठेवावा लागतो. काहींचे नातेवाईक अन्य शहरातून किंवा गावांहून येत असतात. त्यांच्या प्रवासाला अधिक वेळ लागू शकतो. त्या कालावधीत मृतदेह घरी नेण्याऐवजी शीतगृहात ठेवला जातो. किंवा एखाद्या मृतदेहाची ओळख पटलेली नसते. सरकारच्या नियमानुसार काही तासांसाठी तो मृतदेह ठेवावा लागतो. तो कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणी नातेवाइक न आल्यास किंवा ओळख न पटल्यास पोलिसांच्या परवानगीने अंत्यसंस्कार केले जातात. 

आता पोस्टातून मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम 

बर्फाच्या लाद्यांचा वापर 
सध्या शीतगृह बंद असल्याने मृतदेह ठेवण्यास नकार दिला जात आहे. शिवाय, मृतदेह कुजू नये, यासाठी बर्फाच्या लाद्या ठेवलेल्या आहे. मात्र, त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. याकडे माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, शीतगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी निविदा काढली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation mortuary closed for 22 days