esakal | पिंपरी : महापालिकेची सभा ‘ऑनलाइन’च
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी : महापालिकेची सभा ‘ऑनलाइन’च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका (Pimpri Municipal) सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून अर्थात ‘ऑफलाइन’ (Offline) पद्धतीने घेण्याबाबतचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात केले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीही सूचना सरकारकडून महापालिकेला आलेली नसल्याने सप्टेंबर महिन्याची सभा ‘ऑनलाइन’ (Online) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसचिव कार्यालयाने कार्यपत्रिका जाहीर केली असून, २० सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता सभा होणार आहे. महापौर त्यांच्या कक्षातून सभेचे कामकाज पाहणार आहेत.

महापालिकेची ऑगस्टची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे होत्या. या सभेपूर्वी दोनच दिवस अगोदर अर्थात १८ ऑगस्ट रोजी स्थायी समिती कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला होता. ठेकेदाराकडून एक लाख १८ हजारांची लाच घेतल्याचा आरोप अध्यक्षांसह चार कर्मचाऱ्यांवर आहे. या घटनेच्‍या निषेधार्थ विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन केले होते. सर्वसाधारण सभेत निषेधाचे फलक झळकावले होते. त्याला न जुमानता पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांनी सभेचे कामकाज चालूच ठेवले. मात्र, अवघ्या आठ मिनिटांत २२ विषय मंजूर करून त्यांनी सभा कामकाज संपविले होते. त्यावर राष्ट्रवादी व शिवसेनेने आक्षेप घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून अर्थात ऑफलाइन पद्धतीने सभा घेण्याबाबतचे सूतोवाच पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले होते. मात्र, ‘ऑफलाइन सभा’ घेण्याबाबत कोणतीही सूचना सरकारकडून महापालिकेला आलेली नसल्याने सप्टेंबरची सभा ‘ऑनलाइन’ होणार असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: पिंपरी: बांधकाम साइटवर मटेरिअल टाकण्यासाठी घेतली खंडणी; तिघांना अटक

दरम्यान, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या तीन जुलै २०२० व २८ जून २०२१ च्या पत्रानुसार सप्टेंबर २०२१ ची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. महापौर त्यांच्या कक्षातून सभेचे संचलन करणार आहेत. त्यामुळे आयुक्त, अधिकारी आपापल्या कक्षातून सहभागी होणार आहेत. पदाधिकाऱ्यांना पक्षनेते, विरोधी पक्षनेते, विविध समितींच्या अध्यक्षांची दालने, स्थायी समिती सभागृह आदी ठिकाणांसह आपापल्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेही सहभागी होता येणार आहे.

महत्त्वाचे विषय

- स्थायी समितीच्या एका रिक्त जागेवर सदस्य नियुक्त करणे

- अर्थसंकल्पीय सभेसह जून, जुलै व ऑगस्टचा सभावृत्तांत कायम करणे

- थेरगाव रुग्णालयातील नवीन डायलिसिस सेंटर चालवायला देणे

- नदी सुधार योजनेसाठी कंपनी स्थापन करून कर्ज रोखे उभारणीला मान्यता देणे

- अनुकंपा व अन्य कर्मचारी नियुक्तीबाबतचा विषय निकाली काढणे

फक्त तीन सभा हाती

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारीत आहे. त्यापूर्वी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही महिन्यात सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता नाही. परिणामी, प्रत्येक महिन्याला एक सभा, यानुसार केवळ ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन सभाच शिल्लक आहेत. त्याही ऑनलाइन झाल्यास विरोधी पक्ष राष्ट्रवादी व शिवसेनेला सत्ताधारी भाजपला जाब विचारण्याची संधी मिळणार की नाही? या बाबत प्रश्‍नचिन्ह आहे. ऑफलाइन सभा घेण्यासाठी ते आग्रही आहेत.

loading image
go to top