विषमुक्त शेतीकडे शहरवासीयांचा कल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

अगदी कमी खर्चात व श्रमात जास्तीत जास्त उत्पादन होत असल्याने शहरवासीय नैसर्गिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत.कमी जागेत सुमारे 35 ते 40 प्रकारची वेलवर्गीय व मातीतील पिके नागरिकांनी घेतली आहेत. 

पिंपरी - "विषमुक्त अन्नासाठी-विषमुक्त शेती' ही काळाची गरज ओळखून सिमेंटच्या जंगलात जागा मिळेल तिथे शेतीप्रेमी रसायनअंश मुक्त शेतीचे प्रयोग घराच्या टेरेस व अंगणात करू लागले आहेत. अगदी कमी खर्चात व श्रमात जास्तीत जास्त उत्पादन होत असल्याने शहरवासीय नैसर्गिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. कमी जागेत सुमारे 35 ते 40 प्रकारची वेलवर्गीय व मातीतील पिके नागरिकांनी घेतली आहेत. 

आकुर्डी व निगडी प्राधिकरण, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, चिंचवड, वल्लभनगर आदी भागात या शेतीचे प्रयोग नागरिकांनी केले आहेत. शहरात लोकसंख्या वाढली असून, रहिवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे टेरेसवरील जागेचा वापर विषमुक्त शेतीसाठी केला जात आहे. पारंपरिक पद्धतीने शेती न करता पोयटा, तांबड्या व काळ्या मातीत काकडी, मिरची, टोमॅटो, घेवडा, शेवगा, भेंडी, गाजर, बीट, वांगे व वेलवर्गीय उत्पादन घेण्यात आले आहे. साधारणतः: पाचशे ते सहाशे सेक्वर फूट जागेत देखील उत्तम प्रकारचे उत्पादन घेतले जात आहे. 

शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​

कीटकनाशकसाठी जीवामृत, घनजीवामृत, गोमूत्र, ताक, मिरचीचे पाणी, हळदीचे पाणी, निमआर्क, दशपर्णी आर्कची फवारणी केली जात आहे. शेणखत व स्वयंपाक घरातील पाण्याच्या वापरावरही ही शेती होते. सध्याच्या कृत्रिम आयुष्यात रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कर्करोग, हृदयरोग, रक्तदाब यासारख्या अनेक आजारांना नैसर्गिक शेतीमुळे आवर घालणे शक्‍य झाल्याचे दिसून येत आहे. अनेक रोगांना आवर घालण्यासाठी नागरिक या शेतीला प्राधान्य देत आहेत. ते देखील शहरातील तुटपुंज्या जागेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी कुंडी व जमिनीत दहा ते बारा प्रकारची पिके घेतली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कमी खर्चात भाजीपाला होतो. रात्री झाडांना स्प्रिक्‍लंर व ठिबक सिंचनाद्वारे पाणी देतो. देखभाल दुरुस्ती कष्टदायी व खर्चिक नाही. 
- प्रा. शिवलिंग ढवळे, भोसरी, शेतीप्रेमी 
 

""विषमुक्त शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो. आजारपण कमी होते. मालाला चांगला भाव मिळतो. पाण्याची बचत 50 टक्के होते. मातीची धूप थांबून पाणी जिरते. जमीन सुपीक ठेवणे गरजेचे आहे. झिरो बजेटमध्ये ही शेती करता येते. अतिरिक्त विष फवारणी न करता नैसर्गिक कीड नियंत्रणाचा अधिकाधिक अवलंब करणे गरजेचे आहे.'' 
- प्रभाकर तावरे, इंद्रायणीनगर, शेतीप्रेमी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad news non-toxic agriculture vegetables