नागरिकांची बेफिकिरी वाढली, मास्क आणि सॅनिटायझरची मागणी घटली | Pimpri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mask & sanitize

पिंपरी : नागरिकांची बेफिकिरी वाढली, मास्क आणि सॅनिटायझरची मागणी घटली

पिंपरी : शहरात कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने बिनधास्त झालेल्या नागरीकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केला आहे. परिणामी, ‘एन ९५’ मास्कची जागा आता कापडी मास्कने घेतली आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची विक्री घटून २० टक्क्यांपर्यंत आली आहे. नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढल्याने या कोरोना प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

कोरोना लस घेतली आता आपल्याला काहीच होणार नाही, अनेक लोक कोविड गेला, ’ अशा आविर्भावात गेल्या काही महिन्यांपासून नागरिक बिनामास्कचे वावरताना दिसत आहेत. हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रे ठेवणाऱ्या नागरिकांनी आता सॅनिटायझर वापरणे कमी केले आहे. परिणामी, मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती उतरल्या आहेत, तरी देखील लोक ते घेत नाहीत.

मास्क व सॅनिटायझरची विक्री देखील एक टक्क्यांवर आली आहे. अनेक औषध विक्रेत्यांनी सॅनिटायझरच्या बाटल्या व मास्क मोठ्या प्रमाणात आणले आहेत. तो सर्व माल आता पडून आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही काही प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे लोकांनी किमान मास्क तरी वापरले पाहिजे, असे निरीक्षण त्रिपर्ण डिस्ट्रिब्युटर्स औषध विक्रेते वैभव पाटील त्यांनी नोंदविले आहे.

मास्कच्या विक्रीत घट

गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर ‘एन ९५’, तसेच अन्य प्रकारच्या सर्जिकल मास्कचा वापर सुरू झाला. त्यावेळी ६० टक्क्यांवर सुरू असलेली विक्री मे महिन्यात १०० टक्क्यांपर्यंत वाढली. मात्र, त्याचा खप जून महिन्यापासून कमी होत गेला. जुलैमध्ये ७० टक्के असलेली ‘एन ९५’, मास्कची विक्री ऑक्टोबर महिन्यापर्यंत ३० टक्क्यांपर्यंत खाली आली. त्या वेळी ‘एन ९५’ मास्क, तसेच सर्जिकल मास्क वापरण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झाले. सर्जिकल मास्क केवळ रुग्णालयात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. ऑक्टोबरनंतर सामान्य नागरिकांनी मात्र कापडी मास्कवर भर दिला आहे. आता ऑक्टोबर महिन्यापासून मास्क, तसेच सॅनिटायझरचा खप आणखीच कमी होऊन साधारणतः १५ ते २० टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा यांनी दिली.

सॅनिटायझरची मागणी कमी

सुजय जेनेरिक स्वस्त औषध विक्रेते वर्षा भालेराव यांनी सॅनिटायझरचा वापर ५० ते ७० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविले. त्या म्हणाल्या, ‘‘मे महिन्यानंतर महिन्यापासून साहित्याचा वापर कमी झाल्याने विक्री कमी झाली. रुग्ण वाढण्याची भीती कमी झाली आहे. परिणामी, सॅनिटायझर, मास्क उपलब्ध असले, तरी मर्यादित स्वरूपात त्याचा वापर सुरू आहे. सोसायट्यांकडूनही मागणी कमी झाली आहे.’’

‘‘शहरातील हॉटेल, मोठ्या संस्था तसेच रुग्णालयांमध्ये सॅनिटायझरचा वापर सुरू आहे. मात्र, छोट्या दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवले जात असले, तरी त्याचा वापर होत नसल्याचे दिसते. ‘एन ९५’ मास्कची मागणी सप्टेंबरपासून कमी झाली आहे. ’’

-विवेक तापकीर, उपाध्यक्ष केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्ट

  • महिना (२०२१) टक्के

  • मार्च -६० ते ७०

  • एप्रिल - ९०

  • मे - १००

  • जून - ८० ते ८५

  • जुलै - ७०

  • ऑगस्ट - ५५

  • सप्टेंबर - ३५

  • ऑक्टोबर - ३०

टॅग्स :Pimpri