
गेल्या आठवड्यापासून महापालिका शाळेत पन्नास टक्के शिक्षकांची हजेरी लावण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेत 50 टक्के शिक्षक उपस्थित राहून शिकवत आहेत.
पिंपरी : कोरोनामुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. स्वच्छता कर्मचारी 'ड्यूटी'वर नसल्याने वर्गखोल्या धुळीने माखल्या आहेत. सगळीकडे कचरा पडला आहे. अशास्थितीत सध्या पन्नास टक्के शिक्षक धुळीत बसून ऑनलाइन शिकवत आहेत, असे प्रातिनिधिक चित्र पिंपरी गावातील विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत 'सकाळ' प्रतिनिधीला पहायला मिळाले. 'स्मार्ट' शाळेसाठी निवड झाली आहे; पण सध्याची अवस्था पाहून ही शाळा कधी 'स्मार्ट' होईल, अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
- पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग
गेल्या आठवड्यापासून महापालिका शाळेत पन्नास टक्के शिक्षकांची हजेरी लावण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेत 50 टक्के शिक्षक उपस्थित राहून शिकवत आहेत. परंतु बहुतांश शाळांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश देवूनही शिक्षण विभागाने शाळांची साफसफाई करून घेतलेली नाही. हे कर्मचारी आठवड्यातून दोनवेळाच येत असल्याने ही परिस्थिती पिंपरी गावातील विद्यानिकेतन शाळेत दिसली. ही शाळा दोन सत्रात भरते. शाळेची 'स्मार्ट' शाळेसाठी निवड केली आहे; पण सध्या या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात कचरा साठला आहे. सगळ्या बाकांवर धूळ, वऱ्हाड्यांत झाडांचा पालापाचोळा पडला आहे. तीन रखवालदार आणि दोन सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. मात्र, कोणीच स्वच्छता करण्यासाठी येत नसल्याने शाळेची कचराकुंडी होण्याचे बाकी राहिले आहे.
- यंदा आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार; आरोग्यमंत्र्यांनी दिलं गिफ्ट
उन्नत केंद्र की अडगळीची खोली?
पिंपरी उन्नत समूह केंद्राचे या शाळेतून कामकाज चालते, पण तीन वर्षापूर्वीच बंद पडलेल्या सर्व शिक्षा अभियानअंतर्गतचे साहित्य धूळखात आहे. तीन वर्गखोल्यांमध्ये मोठाले कपाट, टेबल-खुर्च्या अस्ताव्यस्त पडून आहेत. हे साहित्य उचलून नेण्यासाठी वारंवार शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तरीही अनेक वर्षापासून या वर्गखोल्यांना अडगळीची खोली केली आहे. परिणामी, स्मार्ट शाळेचे काम करण्यास अडचणी येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
"सध्या 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा भरत आहेत. परंतु स्वच्छता नसल्याने अनेक शिक्षकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.''
- विजय कुंजीर, मुख्याध्यापक, विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, पिंपरी वाघेरे
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)