esakal | पिंपरी : फी भरण्यावरून गोंधळ; चौघांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पिंपरी : फी भरण्यावरून गोंधळ; चौघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालयात शुल्क भरण्याच्या वादातून विद्यार्थ्याने काचेच्या दरवाजावर डोके आपटून घेतले. त्यानंतर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली, अशा तक्रारीवरून पिंपरी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महाविद्यालयात बुधवारी सकाळी (ता. २९) साडेदहाच्या सुमारास घडला.

शुभम कैलास बारोठ (वय २४, रा. बालाजीनगर, भोसरी) असे फिर्यादी विद्यार्थ्याचे नाव आहे. तर मयूर (पूर्ण नाव व पता माहीत नाही) व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सकाळी शुभम फी भरण्यासाठी व मास कम्युनिकेशनचा निकाल नेण्यासाठी महाविद्यालयात आला होता. त्यावेळी फी भरण्यावरून प्राचार्यांशी त्याचा वाद झाला. त्याचवेळी शाळेतील शिपाई यांनी मला प्लॅस्टिक खुर्ची व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेबाबत महाविद्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शुभम हा वर्गमित्र ओंकार जाधव याच्यासह प्राचार्य कक्षात आला. फी माफीविषयी प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्याशी वाद घातला. दरम्यान, फी माफ करण्याचे अधिकार मला नाहीत हे प्राचार्य त्यांना समजावून सांगत होते. रयत शिक्षण संस्था, सातारा व महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार तुम्हाला फी भरावी लागेल. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे ज्या बाबींचा वापर करण्यात आला नाही त्या बाबींची फी २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात माफ करावी, असे असल्याने ती सवलत तुम्हाला या वर्षाची २०२०-२०२१ मी देऊ इच्छितो व उर्वरित फी तुम्ही टप्प्या टप्याने भरू शकता, असे शुभमला सांगितले.

मात्र, शुभम यास यापैकी काहीही मान्य नव्हते. तो बाहेर गेला व मोबाईल घेऊन परत आला. पुन्हा प्राचार्यांशी चर्चा केली. केबिनच्या काचेवर स्वतः धडक मारली. यामध्ये दरवाजाची काच फुटून त्याला लागली. तसेच काचेचा एक तुकडा प्राचार्य कक्षाबाहेर असलेल्या शिपाई सेवक सुरेश देसाई यांच्या हातावर लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर विद्यार्थी काचेचा तुकडा घेऊन बाहेर गेला. दरम्यान, काही गैरप्रकार घडू नये महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला धरून आणले. व पोलिस येईपर्यंत खोलीत थांबविले. असा प्रकार घडला असून विद्यार्थ्यास प्राचार्य अथवा कोणत्याही शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्येही शुभम हा प्राचार्यांच्या केबिनमध्ये आल्यानंतर काही वेळ चर्चा करून काचेवर डोके आपटताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये विद्यार्थी व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची झटापट सुरु असल्याचे दिसून येते.

दरम्यान, विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहे.

loading image
go to top