esakal | Pimpri: महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad Municipal Corporation

पिंपरी : महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपत आहे.‌ त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे स्पष्ट केले आहे. त्या अधिनियमानुसार प्रारूप प्रभाग (वॉर्ड) रचना करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस यांनी मंगळवारी काढली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार असून नगरसेवकांची संख्या १२८ व प्रभागांची संख्या ४३ राहणार आहे.

कोरोनामुळे २०२१ ची जनगणना झालेली नाही. त्यामुळे २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन निवडणूक होणार आहे. मात्र, मतदारांची संख्या वाढलेली असल्याने त्यांच्यासाठी त्या-त्या वॉर्डातील मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. नगरसेवकांची संख्या मात्र, आताच्या इतकीच म्हणजेच १२८ च राहणार आहे. दरम्यान, महापालिकेत २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती.

हेही वाचा: अमरावती : परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर

२०१७ मध्ये भाजपने एकहाती सत्ता घेतली. तत्कालीन फडणवीस सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेतल्याने भाजप विजयी झाल्याचा मतप्रवाह आजही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचाही चार सदस्यीय पद्धतीने आगामी निवडणूक घेण्यास विरोध होता. परिणामी, एक किंवा दोन सदस्याय प्रभाग पद्धतीने निवडणूक होईल, असे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने बहुसदस्यीय अर्थात तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांनीही तसा अध्यादेश काढला असून त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबतची सूचना महापालिका निवडणूक विभागाला केली आहे.

तीन सदस्यांचे ४२, दोनचा एक प्रभाग

आगामी निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली जाणार असल्याने नगरसेवकांची संख्या १२८ राहणार आहे. तीन सदस्यांमध्ये त्याची विभागणी केल्यास १२६ नगरसेवकांसाठी ४२ प्रभाग होतात. उर्वरित दोन सदस्यांसाठी ४३ वा प्रभाग केला जाणार आहे. कारण, सर्व प्रभाग तीन सदस्यांचे करणे शक्य नसल्यास एक प्रभाग दोन किंवा चार सदस्यांचा राहील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. नगरसेवकांची संख्या १२७ असती तर ४२ क्रमांकाचा प्रभाग चार सदस्यांचा राहिला असता. मात्र, उर्वरित दोन सदस्य शेवटच्या प्रभागात समाविष्ट केल्यास नगसेवकांची संख्या पाच झाली असती. त्यामुळे दोन सदस्यांचा स्वतंत्र प्रभाग ४३ क्रमांकाचा असेल.

हेही वाचा: अमरावती : शेतकऱ्यांना घरपोच मिळणार सातबारा

असे ठरतात प्रभाग

प्रभाग रचना करताना शहराची लोकसंख्या आणि महापालिका सदस्यांची संख्या विचारात घेतली जाते. म्हणजेच एकूण लोकसंख्या भागिले महापालिकेची सदस्य संख्या बरोबर त्या प्रभागातील सदस्यसंख्या. या सूत्रानुसार प्रभगांची संख्या निश्चित करावी. मात्र, प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा जास्त या मर्यादेत प्रभागातील लोकसंख्या ठेवता येते. प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी एक समिती नियुक्त केली आहे. २०१२ च्या निवडणुकीवेळी केलेल्या प्रगणक गटानुसारच (ब्लॉक) प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक मर्यादा अर्थात मोठे रस्ते, नाले, नद्या, पूल, गल्ली यानुसार प्रभागांच्या सीमा ठरणार आहेत.

पहिला तळवडे; शेवटचा सांगवी

प्रभाग रचना करताना शहराच्या उत्तरेकडून केली जाणार आहे. त्यामुळे उत्तरेकडील पहिले गाव तळवडे असल्याने पहिला प्रभाग तळवडेतील असेल. तेथून चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल, भोसरी, एमआयडीसी, संभाजीनगर, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, रावेत, किवळे, मामुर्डी, अशा पद्धतीने प्रभाग होतील. शेवटचा प्रभाग शहराच्या दक्षिणेस असेल. त्यानुसार दापोडी किंवा सांगवीत शेवटचा प्रभाग असेल. २०१२ च्या निवडणुकीत शेवटचा प्रभाग दापोडीत होता. तर, २०१७ च्या निवडणुकीत शेवटचा प्रभाग जुनी सांगवीतील आहे. त्यामुळे आता शेवटचा व दोन सदस्यांचा प्रभाग कोणता असेल, याबाबत उत्सुकता आहे.

loading image
go to top