esakal | Vidarbh: परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर
sakal

बोलून बातमी शोधा

परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर

अमरावती : परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोझरी (जि. अमरावती) : गेल्या महिन्याभऱ्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहे. खरीप हंगामातील नगदी पीक असलेले सोयाबीन पीक घरी येण्याच्या तयारीत असतानाच चार ऑक्टोबर रोजी तिवसा तालुक्यात दुपारी अचानक वादळवाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर तसेच संत्रापिकांना जोरदार फटका बसला. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडलेली दिसून येत आहे.

अचानक आलेल्या वादळवाऱ्यासह गारपिटीचा सर्वाधिक फटका तालुक्यातील पालवाडी, कवाडगव्हाण, शेंदूरजना माहुरे, वाठोडा व बन्सापूर शेतशिवारासह आदी गावांना बसला. हाती आलेले पीक निसटून गेल्याने शेतकरी निःशब्द झाला आहे. आधीच शेतमालांचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे आता शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून वर्षभऱ्याच्या मेहनतीवर एकाएकी पाणी फेरल्या गेल्याने शेतकऱ्यांचा पुढील प्रवास अत्यंत खडतर झाला आहे.

हेही वाचा: मालवण : परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्सची पुन्हा घुसखोरी

विशेष म्हणजे, आंबिया बहाराच्या संत्राबागांकडे शेतकरी आशेने पाहू लागला होता. एकरकमी भरघोस उत्पन्न देणाऱ्या संत्राबागा विक्रीसाठी तयार असताना ऐनवेळी निसर्गाने आपला डाव साधला. त्यामुळे संत्राबागांना चांगलाच मार बसला असून शेतात संत्राफळांचा सडा पडलेला आहे. शासनाने पंचनामा करावे व शेतकऱ्यांचे नुकसान पाहून त्यांना बांधावरच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यांची आणेवारी घोषित करण्यात आली होती. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. परंतु कालच्या अस्मानी संकटाने क्षणातच होत्याचे नव्हते झाले. तेव्हा खरचं शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर शासनाने ताबडतोब मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी, असे मत पालवाडी गटग्रामपंचायतचे सरपंच नंदकिशोर फाले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: कुडाळ : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ शनिवारपासून सुरू

जगण्याचा आधारच हिरावला

निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा आदी पिके बाधित झाली असल्याने शेतकऱ्यांचे माकडहाडच मोडले गेले. कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे मत कवाडगव्हाण येथील शेतकरी बबलू चौधरी यांनी व्यक्त केले.

loading image
go to top