वायसीएममध्ये ३०० व्हिसेरा पडून;प्रलंबित व्हिसेरा घेण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्र

आशा साळवी - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

व्हिसेरा अहवालाच्या संदर्भातील अनेक  प्रकरणे ही न्याय वैद्यकीय कक्षेत येतात. त्यामुळे ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी व्हिसेरा अहवाल पोलिसांनी ताब्यात घेऊन सादर करणे आवश्‍यक आहे.

पिंपरी - शहरी व ग्रामीण भागातील खून, अपघात, अपमृत्यू, विषबाधा किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणांतील मृत्यूमागील नेमके निदान करण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) करण्यात येते. मात्र, मागील अकरा वर्षांतील सुमारे ३०० व्हिसेरा प्रकरणे अद्याप पडून असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अशा प्रकरणांतील तपास मार्गी लागावा, यासाठी पोलिसांनीही प्रलंबित असलेला व्हिसेरा मुदतीत घेऊन जाण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठातांनी यांनी पोलिस आयुक्‍तांकडे पत्रव्यवहार केला आहे. 

व्हिसेरा अहवालाच्या संदर्भातील अनेक  प्रकरणे ही न्याय वैद्यकीय कक्षेत येतात. त्यामुळे ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी व्हिसेरा अहवाल पोलिसांनी ताब्यात घेऊन सादर करणे आवश्‍यक आहे. परंतु, ग्रामीण पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अनेक अहवाल २०१० प्रलंबित आहेत. ते लवकर घेऊन जाण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे शवविच्छेदन विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत शिंगे यांनी सांगितले. काही न्यायवैद्यकीय प्रकरणांमध्ये मृत्यू नैसर्गिक आहे वा अनैसर्गिक याचे निदान करण्यासाठी त्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये विश्‍लेषण केले जाते. हा अहवाल सर्वांत मोठा पुरावा ठरत असल्याने तो मिळेपर्यंत ही प्रकरणे न्यायालयात जात नाहीत. अपघातासारख्या दुर्घटनांमध्ये दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळण्यातही यामुळे अडचण निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुणेकरांनो पालिकेच्या एक दिवसाच्या ऑनलाइन सभेचा खर्च बघा

वायसीएम रुग्णालयामध्ये शहर परिसरासह आळंदी, चाकण, म्हांळुगे आणि खेड  या ग्रामीण ठिकाणांहून व्हिसेरा तपासणीसाठी येत असतात. वैद्यकीय विश्‍लेषणासाठी आलेल्या प्रत्येक बाटलीत दहा ते बारा अवयवांचे अवशेष असतात. मृत्यूचे निदान योग्य रीतीने न झाल्यास अवयवांचे अतिरिक्त अवशेष घेऊन हे निदान करावे लागते. दररोज ३ ते ५ प्रकरणे रुग्णालयात व्हिसेरा तपासणीसाठी येतात. एका व्हिसेराच्या वैद्यकीय तपासणीसाठी किमान आठ ते दहा दिवसांचा अवधी लागतो. या विभागामध्ये व्हिसेरा तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची  संख्या कमी असून केवळ सात कर्मचारी काम पाहत आहेत.

हे वाचा - मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार; स्मशानभूमीतील बेड चोरट्यांनी पळवला!

पोलिसांसाठी स्वतंत्र खोली
शवविच्छेदनानंतर राखून ठेवलेला व्हिसेरा संबंधित शहरी पोलिसांना दिला जातो. परंतु, ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील शवविच्छेदन हे शहर पोलिसांमार्फत करून ही प्रकरणे टपालाने ग्रामीण पोलिस ठाण्यांना पाठविले जाते. या कामांमध्ये व्हिसेराचे नुकसान होऊ नये. या उद्देशाने पिंपरी पोलिस ठाणे वरिष्ठ निरीक्षकांच्या ६ जानेवारी २०१७ मागणीनुसार वैद्यकीय अधीक्षकांनी ३ एप्रिल २०१७मध्ये एक स्वतंत्र खोली पोलिसांना उपलब्ध करून दिली. त्याची पूर्ण जबाबदारी आणि पूर्ण ताबा पोलिस अधिकाऱ्यांकडे आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर लगेचच व्हिसेरा संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिला जातो. त्याची पोच घेतली जाते, पण २० जून २०१८मध्ये पोलिस अधीक्षक ग्रामीण पाषाण यांना प्रलंबित व्हिसेरा मुदतीत जमा करा अन्यथा काही नुकसान झाल्यावर वायसीएम रुग्णालयाची राहणार नसल्याचे अधिष्ठाता यांनी पोलिसांना कळविले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नियमानुसार पोलिसांनी २४ ते ४८ तासात व्हिसेरा जमा करणे आवश्‍यक आहे. अगदी आठवडाभरात जमा केला तरी चालेल. परंतु, शहर पोलिसांपेक्षा ग्रामीण पोलिसांकडून प्रतिसाद अजिबात मिळत नाही. त्यामुळे व्हिसेरा याचे नुकसान होऊ शकते. अनेकदा खराब झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news ycm hospital Pending visera Police Commissioner