'तो' ट्रकमधील माल डिलिव्हरीसाठी न्यायचा, पण वाटेतच गायब करायचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

  • आठवड्यात तीन घटना उघडकीस 

पिंपरी : ट्रकमध्ये माल भरून डिलिव्हरीसाठी संबंधित ठिकाणी पोहोचविण्यासाठी रवाना करायचा. मात्र, डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचण्यापुर्वीच ट्रकमधील माल गायब करणाऱ्या ट्रकचालकाला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. टायर, खाद्यतेलाचे डबे, सिमेंटच्या गोण्यांची चोरी करून त्याची परस्पर विक्री केल्याच्या आठवड्याभरात तीन घटना उघडकीस आल्या असून, याप्रकरणी आरोपीवर भोसरी व दिघी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 

लोणावळा नगर परिषदेची दंडमाफीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 

सुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. चिंबळी फाटा, मूळ- रा. तिरूपटेलवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. पहिल्या घटनेत 
प्रदीप सोमदत्त शर्मा (रा. मोशी) यांनी त्यांच्या ट्रकमधील 160 टायर चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. शर्मा यांच्या कंटेरनवर राजोळे चालक म्हणून कामाला असताना ट्रान्सपोर्टचे मालक अनमोल वायचळ यांच्या मार्फत चाकण येथील एका कंपनीतून फिर्यादीच्या कंटेनरमध्ये 421 टायर भरले होते. हे टायर मुंबई येथे पोहोचवायचे होते. मात्र, आरोपीने भोसरी येथे कंटेनर थांबवून त्यातील 160 टायर चोरले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसऱ्या घटनेत खाद्यतेलाचे 112 डबे चोरीला गेल्याबाबत मनोज कुमार शिंदे (रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली. शिंदे व राजोळे हे दोघेही चालक असून, शिंदे यांना खोपोलीमधील तेलाच्या कंपनीतून तेलाचे डबे वाहतूक करण्याची ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार राजोळे याच्याकडील ट्रकमध्ये तेलडबे पोहचवित असताना रस्त्यातच ट्रकमधील 112 तेलाचे डबे त्याने गायब केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तिसऱ्या घटनेत पियुष भूपेंद्र त्रिवेदी (रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली. राजोळे हा 2 ऑगस्ट रोजी त्रिवेदी यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. दरम्यान, दिघी येथील मॅगझीन चौकातून आळंदी रोडने जात होता. त्यावेळी ट्रकमधील एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या चारशे सिमेंटच्या गोण्या चोरून त्याची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले असून, दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested the driver who was stealing goods from the truck