DM Saptanekar Home in vadgav
DM Saptanekar Home in vadgavsakal

Dr Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांच्या वडगावभेटीचे स्मृतिचिंतन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातील बारीकसारीक तपशील जसा उपलब्ध होतो आहे, तसा टिपला जातो आहे. अशीच एक आठवण, फारशी प्रचलित नसलेली.
Summary

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातील बारीकसारीक तपशील जसा उपलब्ध होतो आहे, तसा टिपला जातो आहे. अशीच एक आठवण, फारशी प्रचलित नसलेली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातील बारीकसारीक तपशील जसा उपलब्ध होतो आहे, तसा टिपला जातो आहे. अशीच एक आठवण, फारशी प्रचलित नसलेली. वडगाव मावळमध्ये घडलेली. तेव्हा बाबासाहेब वडगाव न्यायालयात आले होते. न्या. दि. म. सापटणेकर होते. त्यांनी बाबासाहेबांना घरी येऊन जेवणासाठी आग्रह केला होता. सापटणेकर ब्राह्मण समाजाचे होते. स्पृश्य-अस्पृश्यतेचा मोठा पगडा होता. त्या वेळी घडलेल्या या घटनेच्या चिरंतन स्मृती आजही वडगावचे न्यायाधीश निवासस्थान जपत आहे.

नोव्हेंबर १९५२ मध्ये देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली तेव्हाची. भंडारा लोकसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उमेदवारी घोषित झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काळात ते लोणावळ्यास विश्रांतीसाठी आले होते. निवडणुकीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम अंतिम टप्प्यावर होते. एका फॉर्मवर न्यायाधीशांची स्वाक्षरी आवश्यक होती. लोणावळा पोलिस ठाणे वडगाव-मावळ न्यायालयाच्या अंकित होते.

बाबासाहेबांनी पोलिस जमादारास बोलावून घेतले. कोर्ट लोणावळ्यात येऊन फॉर्मवर स्वाक्षरी करतील किंवा कसे? याची विचारणा करायला लावली. न्यायाधीश दि. म. सापटणेकर होते. पोलिसांकडून निरोप मिळाला, पण कोर्टाचा प्रोटोकॉल पाळावा लागणार होता. फॉर्म भरताना, स्वाक्षरीची मोहर उमटवतांना शिरस्त्यानुरुप कोर्ट रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी लागणार होती. हा दस्तऐवज बाहेर नेता येत नाही. प्रश्न प्रशासकीय नियमांचा होता. मात्र, त्यांना बॅरिस्टर आंबेडकर व त्यांच्या कायद्याच्या अथांग ज्ञानाबद्दल कुतूहल होते. प्रत्यक्ष भेटायची मनीषाही होती. न्या. सापटणेकरांनी पोलिसांमार्फत, ‘साहेबांना फॉर्म भरण्यासाठी कोर्टात येणेच उचित राहील’, असा निरोप दिला. हा निरोप अत्यंत विनम्रतेने देण्याची काळजी घेण्याबाबत सुचवले. पोलिसांनी बाबासाहेबांना वस्तुस्थिती सांगितली. बॕ. खोब्रागडे आणि सहचारिणी माईसाहेब यांच्यासह खासगी मोटारीने बाबासाहेब वडगाव न्यायालयात हजर झाले. सापटणेकर स्वागताला सामोरे गेले. हस्तांदोलन झाले. कोर्टाच्या चेंबरमध्ये आणले. फॉर्म भरून कोर्ट रजिस्टरमध्ये नोंद करून स्वाक्षरी केली.

न्या. सापटणेकर बोलले. ‘साहेब माफ करा. आपल्याला तसदी दिली.’ त्यावर डॉ. आंबेडकर हसत उत्तरले, ‘अहो सापटणेकर खरं तर मीच तुमचे आभार मानतो. न्यायासनाची शान राखलीत मला आवडले. न्यायाधिशांनी असाच ताठ कणा ठेवायला हवा. या न्यायासनाचा सम्राटांनीही मान राखायला हवा.’’ सापटणेकरांनी हात जोडून म्हणाले, ‘साहेब आपण येणार म्हणून जेवणाचा बेत आखलाय, तुम्ही नाही म्हणू नका.’ त्यावर बाबासाहेबांनी माईसाहेबांकडे कटाक्ष टाकला. त्यांनीही होकारार्थी मान हलवली. बाबासाहेब म्हणाले, ‘हा तर दुग्धशर्करा योगच म्हणायचा. पण काय हो, तुमच्या कुटुंबाच्या सोवळ्या ओवळ्याला हे चालेल ना?’, न्यायमूर्ती म्हणाले, ‘डॉ. साहेब पत्नीनेच भोजनाचा घाट घातलाय.

तीच स्वतः वाढणार आणि आपल्या समवेत पंक्तीचा लाभ घेणार.’ बाबासाहेबांना नाही म्हणवेना. जवळच असलेल्या न्यायाधीश निवासस्थानी ते पोहचले. पार्वतीबाई सापटणेकरांनी डॉक्टरांना पंचारतीने ओवाळले. त्यांचे कुटुंबीय भारावून गेले होते. बाबासाहेबांच्या पथ्यपाण्याची माहिती काढूनच त्यांनी सुग्रास बेत केला होता. आवडीचे पदार्थ बघून बाबासाहेब आश्चर्यचकित झाले. जेवताना मनमुराद गप्पा झाल्या. मनात साठवलेले प्रश्न कुतूहलाने सापटणेकर विचारत होते आणि बाबासाहेब समर्पक उत्तर देत होते. यात राज्यघटनेचे प्रारूप तयार करण्यापासून, कायद्याच्या त्रुटी, लोकशाहीची वाटचाल, न्यायालयाचे निवाडे आणि सामाजिक उत्तरदायित्व अशी चर्चा सुरू होती.

सापटणेकरांनी, ‘आपण बुद्धधर्म का स्वीकारत आहात’? असं विचारताच. बाबासाहेब म्हणाले, ‘हिंदू धर्माच्या हितासाठी आणि लाखो अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी.’ सापटणेकरांनी त्यांना कायद्याची पुस्तक दाखवली. ते पाहून बाबासाहेब भारावून गेले. त्यांनी निरोप मागितला. डॉ. बाबासाहेब स्नेहभोजनासाठी थांबणं ही सापटणेकर कुटुंबीयांसाठी पर्वणीच होती. सौ. सापटणेकरांनी नमस्कारासाठी नतमस्तक होताच बाबासाहेब म्हणाले, ‘बाळ, तुला काय म्हणू, सून की लेक?’ ‘साहेब तुमची लेकच म्हणा’ त्यांवर बाबासाहेबांनी, ‘आयुष्यमतीभव्!’ म्हणत प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला आणि निरोप घेतला. न्या. सापटणेकरांनी घडलेली ही आठवण आपल्या कथनांत शब्दरुपाने जतन करून ठेवली. आजही वडगावचे न्यायाधीश निवास या घटनेची स्मृती चिरंतन जपते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com