esakal | खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून उकळले तब्बल ६ कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून उकळले तब्बल ६ कोटी

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - कोरोना उपचारासाठी (Corona Treatment) खासगी रुग्णालये (Private Hospital) भरमसाट बिलांची (Bill) आकारणी करीत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे (Municipal) आल्या आहेत. त्यामुळे सर्व खासगी रुग्णालयांच्या व तक्रारप्राप्त बिलांचे लेखापरीक्षण (Survey) सुरू आहे. आतापर्यंत चार हजार ५९ बिलांची तपासणी झाली आहे. त्यात तब्बल सहा कोटी १५ लाख ६६ हजार ८१८ रुपयांची जादा आकारणी केल्याचे आढळून आले आहे. ही रक्कम संबंधित रुग्ण व नातेवाइकांना परत देण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे. (Private Hospitals Loot Over 6 Crore by Corona Patients)

कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांवर महापालिकेच्या वायसीएम, पिंपरीतील जिजामाता, नवीन भोसरी, चिंचवडचे तालेरा या रुग्णालयांत उपचार केले जात होते. मात्र, गेल्या जुलैपासून रुग्ण वाढल्याने नेहरूनगर येथील मगर स्टेडियमवर व ऑटो क्लस्टर येथे जम्बो रुग्णालये उभारून १७ ठिकाणी कोविड केअर सेंटरही उभारले होते. १३७ खासगी रुग्णालयांनाही उपचारासाठी परवानगी दिली होती. मात्र, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करीत खासगी रुग्णालये अधिक रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यांची शहानिशा करण्यासाठी व संशयित वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार, एक वैद्यकीय अधिकारी, एक लेखाधिकारी, एक तांत्रिक अधिकारी यांची नियुक्ती करून लेखापरीक्षण समिती स्थापन केली आहे. त्यानुसार तक्रारप्राप्त वैद्यकीय बिलांचे लेखापरीक्षण केले जात आहे. जुलैपासून बुधवारपर्यंतच्या (ता. ९) बिलांचे लेखारीक्षण पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: महापालिका आयुक्तांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते

दृष्टिक्षेपात लेखापरीक्षण...

  • ४०५९ - तपासलेली बिले

  • ३१.३८ कोटी - प्रत्यक्ष बिलांची रक्कम

  • २५.२२ कोटी - आकारायची रक्कम

  • ६.१५ कोटी - तफावत किंवा परतावा

लेखापरीक्षण का?

सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार नोंदणीकृत हेल्थ केअर प्रोव्हायडर अर्थात विविध रुग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज यांना कोविड संसर्गबाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचे दर निश्‍चित केले आहेत. मात्र, त्यापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी रुग्ण व नातेवाइकांच्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोरोना उपचारावरील वैद्यकीय बिलांचे लेखापरीक्षण सुरू केले आहे.

loading image