
पिंपरी : कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने पालकांना खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क भरणे अवघड जात आहे. मात्र, नियमबाह्य इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट बॅंक खात्याची तपासणीचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे संतापलेल्या अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून शाळा बंदच आहेत. परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू केल्यामुळे दरवर्षीप्रमाणेच ऍडमिशन प्रक्रिया, शुल्क आकारणे सुरूच आहेत. त्यात अनेक पालकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. बहुतांश जणांचे पगार निम्म्यावर झाले आहेत. तरीही शाळांकडून शुल्क भरण्याचा तगादा सुरूच आहे. त्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुल्क भरण्यास सवलत देण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे न्यायालयाने शाळांच्या बाजूने आदेश दिल्याने पालक कात्रीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शुल्क भरण्यास सवलत मागणाऱ्या पालकांच्या बॅंक खात्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यास अनेक पालकांनी विरोध केला, पण तपासणीशिवाय मुलांना शिक्षण देणार नसल्याने पालक वैतागले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई; महापालिकेकडून एकाच दिवसात 27 गुन्हे दाखल
दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांमध्ये खासगी इंग्रजी शाळांविरोधात शुल्क वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या 28 शाळांविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. यात ज्या मुलांनी शुल्क भरले नाही म्हणून त्यांचे ऑनलाइन ग्रुपमधून ब्लॉक करत आहेत, अशा तक्रारी जास्त आहेत. त्यांनाही नोटीस बजावली आहे. 28 शाळांना शिक्षण विभागाने 53 नोटिसा पाठविल्या आहेत. यापैकी अनेक शाळांना तीन ते चार नोटिसा बजावल्या आहेत.
"महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे अनेक पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेतली आहे. संबंधित शाळांना नोटीस पाठवून या प्रकाराचा खुलासा मागितला आहे.''
- ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग