निगडी प्राधिकरणात चिनी वस्तूंची होळी; भाजपकडून जोडे मारा आंदोलन 

टीम ई-सकाळ
Monday, 22 June 2020

चीनच्या या विश्वासघातकी कृत्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निगडी प्राधिकरण विभागातर्फे भेळ चौकात (संत ज्ञानेश्‍वर चौक) चिनी वस्तुंची होळी करण्यात आली.

पिंपरी : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत वीस जवानांना वीरमरण आले. चीनच्या या विश्वासघातकी कृत्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निगडी प्राधिकरण विभागातर्फे भेळ चौकात (संत ज्ञानेश्‍वर चौक) चिनी वस्तुंची होळी करण्यात आली. तसेच, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

नागरिकांना आवाहन करताना अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर म्हणाल्या, "आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात वस्तुंची निर्यात करून अब्जावधी रुपयांची कमाई चीन करतो आहे. या कमाईतून लष्करावर प्रचंड प्रमाणात खर्च करून चीन भारतीय सीमेवर सातत्याने उपद्रवी कारवाया करीत आहे. स्वस्त किमतीच्या प्रलोभनाला बळी पडून असंख्य नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेक चिनी बनावटीच्या वस्तू वापरतात. मात्र, चीन सीमेवर नुकत्याच घडलेल्या दुष्कृत्याच्या निषेधार्थ पक्षीय राजकारण, मतभेद बाजूला ठेवून भारतीयांनी एकजुटीने, संयमाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा, तरच देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांना ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा मोरे म्हणाल्या, "चीन हा विस्तारवादी देश असल्यामुळे शेजारी देशांशी त्याचे संबंध कायम विवादास्पद राहिले आहेत. परंतु भारतासारख्या जगातील मोठ्या लोकशाही देशातील नागरिकांनी देशहितासाठी चीनची आर्थिक कोंडी केली; तर निश्‍चितच चीनचे कंबरडे मोडेल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नागरिकांतर्फे नारायण पांडे, श्रीकृष्ण अभ्यंकर, नीलिमा कोल्हे, मनीषा पोळ, योगेश भागवत, आशिष राऊत, प्रसेन अष्टेकर, विजय नेहरे, नितीन हगवणे, सागर घोरपडे यांनी दैनंदिन घरगुती चिनी वस्तुंची होळी केली. शी जिनपिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करताना "वंदे मातरम्‌', "भारतमाता की जय!' अशा घोषणा दिल्या. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी महापौर आर. एस. कुमार, भाजप मंडल अध्यक्ष विजय शिनकर, भाजप शहर अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सलीम शिकलगार, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव अनुप मोरे, भाजप शहर चिटणीस माणिक फडतरे, शहर उपाध्यक्ष राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest of Chinese goods in Nigdi Pradhikaran