पुण्यात डेटींग अॅपवरून ओळख;आईची औषधे वापरून 16 तरुणांना लुटले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

तरूणीने तब्बल 16 तरूणांना अशा प्रकारे लुबाडून त्यांच्याकडून 15 लाखाचा ऐवज लुटल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पिंपरी - डेटींग साईटवरून तरूणांशी ओळख वाढवल्यानंतर त्यांना भेटण्यास बोलावून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या उच्चशिक्षित तरूणीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. तरूणीने तब्बल 16 तरूणांना अशा प्रकारे लुबाडून त्यांच्याकडून 15 लाखाचा ऐवज लुटल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

भाजप नगरसेविकेच्या पतीवर चोरी प्रकरणी गुन्हा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सायली उर्फ शिखा देवेंद्र काळे (वय 27, रा. राधिका अपार्टमेंट, साधु वासवानी रोड, पुणे) असे अटक केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणात चार तरूणांनी फिर्याद दिली आहे. तर, उर्वरीत 12 जण तक्रार देण्यासाठी आले नाहीत. 10 डिसेंबरला रावेत येथील एका तरूणाला बंबल डेटिंग ऍपवरून तरूणीने संपर्क साधला आणि त्याच्या घरी ती गेली. त्याच्या पेयामध्ये गुंगीचे औषध टाकून त्याच्याकडील एक लाख 85 हजारांचा ऐवज लुबाडून ती पसार झाली होती. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी हा तपास गुन्हे शाखा युनिट चारकडे सोपविला. 

राडा... धुरळा! अखेर सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर! ​

पोलिसांनी तांत्रिक तपास करत बंबल ऍपवर स्वतःचे खोटे प्रोफाईल तयार करून आरोपीला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पुन्हा 17 जानेवारीला वाकड परिसरातील एका हॉटेलमध्ये असाच प्रकार घडला. चेन्नईवरून पुण्यात आलेल्या एका युवकाला गुंगीचे औषध देऊन दीड लाखांचा ऐवज लुटला. पोलिसांचा तपास सुरू होता. दरम्यान, या काळात तरूणीने फ्रेन्ड रिक्वेस्ट ऍक्‍सेप्ट केल्याने पोलिसांनी तिला वाकड येथील भुमकर चौकात भेटायला बोलावून सापळा रचला. त्यानंतर तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने बंबल-बी आणि टिंडर या डेंटिग ऍपवरून पिंपरी - चिंचवड आणि पुणे शहरातील 16 तरूणांना अशाच प्रकारे गंडविल्याचे समोर आले आहे. 

आईच्या औषधांचा करायची वापर 
आरोपी तरूणीचे शिक्षण बीसीएसच्या तिसऱ्या वर्षापर्यंत झाले आहे. तिच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर, तिच्या आईला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी तिच्या आईसाठी दिलेल्या झोपेच्या गोळ्यांचा ती तरूणांना लुबाडण्यासाठी वापर करत होती. रास्ता पेठेतील एका सोनाराला तिने आपले वडील सेवानिृत्त कर्नल असून त्यांना कॅन्सर झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगून चोरीचे दागिने गहाण ठेवले होते. तरूणांना लुबाडताना त्यांचा मोबाईल नेऊन मोबाईल ऍपवरील खाते बंद करून मोबाईल फोडून पुरावा नष्ट करत होती. तिच्याकडून 15 लाख 25 हजारांचे सोन्याचे दागिने, मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune 27 year old girl fraud use dating app