सगळेच म्हणताहेत, 'मी कोरोना योद्धा'; प्रमाणपत्र वाटपांची खैरात

सगळेच म्हणताहेत, 'मी कोरोना योद्धा'; प्रमाणपत्र वाटपांची खैरात

पिंपरी : कणभर काम अन्‌ हातभर प्रसिद्धी. गेल्या तीन महिन्यांपासून जो-तो उठसूट कोरोना योद्धाच झाला आहे. खऱ्या कामाची पावती ही प्रमाणपत्रातून नव्हे, तर कर्तव्याप्रती जागरूक असलेल्या तत्परतेतून मिळते. मात्र, हे भान हरपलेल्या सामाजिक संस्थांनी शहरात बेकायदेशीरपणे 'कोरोना योद्धा' प्रमाणपत्र वाटपांचा सुळसुळाट सुरू केला आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी सोशल मीडियावर कोरोना योद्धा प्रमाणपत्रांची शहरात ठिकठिकाणी खैरात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात एक लाख सामाजिक संस्था नोंदणीकृत आहेत. तर अनधिकृत संस्थादेखील कार्यरत आहेत. कोरोना योद्‌ध्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी खऱ्या अर्थाने सेवा महत्त्वाची आहे. खरे कोरोना योद्धा हे नर्स, वॉर्डबॉय, डॉक्‍टर व स्वच्छता कर्मचारी आहेत. वैद्यकीय सुविधेशी संबंधित प्रत्येक जण सध्या हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. सुरुवातीला या सर्वांचे मनोबल उंचाविण्यासाठी टाळ्या वाजविल्या. नंतर दिवे लावून थाळ्या वाजविल्या गेल्या. खऱ्या अर्थाने सर्वांचा जयजयकार केला. मात्र, या प्रशंसेला नंतर प्रशस्तीपत्रकाचे लेबल जोडले गेले अन्‌ शहरभर प्रमाणपत्र वाटपाचा ट्रेंडच सुरु झाला.

असं होत आहे या प्रमाणपत्राचे वाटप....

एका संस्थेने दुसऱ्या संस्थेच्या घरी जाऊन किंवा ठरावीक व्यक्ती ठरवूनच प्रमाणपत्रांचे वाटप सध्या सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. खास करून या ना त्या मार्गाने महिलांनी यामध्ये मोठी घुसखोरी केली आहे. गटागटाने या महिला ठिकठिकाणी जाऊन एखादी संस्था हाताशी धरून त्यांना प्रमाणपत्र देत आहेत. कधी प्रत्यक्षात समोर न आलेल्या या संस्था हातात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक घेऊन वाटप करताना दिसत आहेत. लॉकडाउनमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने फूड पॅकेट पुरविले तसेच, विनामूल्य मेडिकल सुविधा पुरविल्या त्यांचाही गौरव केला जात आहे. मात्र, सद्य:स्थितीत या प्रमाणपत्र वाटपाची झुंबडच उडाली आहे. सोशल डिस्टन्सलाही हरताळ फासला जात आहे. दहा ते बारा जण ग्रुपने मिळून सोशल मीडियावर प्रमाणपत्रातून गुणगौरव झाल्याचे फोटो अपलोड करत आहेत. त्यावर लाईक, कंमेट्‌सचा पाऊस पाडून धन्यता मानत आहेत.

काय अपेक्षा आहेत या संस्थांकडून

गोरगरिबांचे मनोबल उंचावणे. दोन वेळेच्या अन्न-पाण्याची भ्रांत असलेल्यांना निवारा देणे, नागरिकांना आरोग्यसहित शिक्षण व चांगल्या सुविधा पुरविणे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मदत करणे. शैक्षणिक बाबींसाठी मदत करणे. वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना वेळोवेळी अन्नधान्य व इतर मदत पुरविणे. झोपडपट्टीतील रहिवाशांचे राहणीमान सुधारण्यासाठी हात पुढे करणे.

प्रमाणपत्राचे वाटप कायदेशीर नाही. सामाजिक संस्था मूळ उद्देशाला हरताळ फासत आहेत. प्रशस्तिपत्रक देणे वाईट नाही, पण त्याचा इव्हेंट झाला आहे. सवंग लोकप्रियतेसाठी या संस्थांनी उच्छाद मांडला आहे. शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र व निवारासारख्या मूळ गरजा नागरिकांना पुरविण्यासाठी धर्मादाय संस्था या सामाजिक संस्थांना परवानगी देते. मात्र, या संस्थांनी सत्कार सोहळे साजरे करण्यास सुरुवात केली आहे. मी देखील हे रोज पाहतो. मात्र, या संस्थांना भान हवे. प्रमाणपत्र वाटपाचे हे काम कोणत्याही चौकटीत बसत नसून ते शून्य आहे.
- नवनाथ जगताप, धर्मादाय उपायुक्त, पुणे 

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com