राष्ट्रवादीच्या मिसाळांकडून पद स्वीकारतानाच पुरोगामी विचाराला वाटाण्याच्या अक्षता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

दालनातच घातली पूजा अन् स्वीकारले पद 

पिंपरी : महापालिका भवनातील तिसरा मजला. महापौर व स्थायी समिती सभापती कक्षाशेजारील एका दालनातून पौराहित्य सुरू होते. श्रीगणेशाची विधीवत पूजा सुरू होती. दोन पुरोहित मंत्रोच्चार करीत होते आणि पूजा करणारे यजमान होते विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ. सर्व विधी झाल्यानंतर त्यांनी मावळते विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्याकडून बुधवारी पदाची सुत्रे स्वीकारली. मात्र, पुरोगामी विचाराच्या पक्षाच्याच या पदाधिकाऱ्याने केलेल्या प्रकाराविरुद्ध नापसंती व्यक्त होत आहे. 

लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत 128 पैकी 36 जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. सर्वांना संधी मिळावी, यासाठी दरवर्षी एका नगरसेवकाला संधी देण्याचे पक्ष नेतृत्वाने ठरविले. त्यानुसार अनुक्रमे योगेश बहल, दत्ता साने व नाना काटे यांनी पद भूषविले. पक्षाच्या धोरणानुसार एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने काटे यांनी राजीनामा दिला होता. दरम्यान, या पदासाठी राष्ट्रवादीने इच्छुक नगरसेवकांकडून अर्ज मागविले होते. पाच जण इच्छुक होते. त्यात मिसाळ यांनी बाजी मारली आणि काटे यांच्याकडून सुत्रे स्वीकारली. 

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

मिसाळ यांच्या निवडीची माहिती देताना पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ""शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी आम्हीही प्रशासनासोबत प्रयत्न करणार आहोत. मात्र, महापालिकेत खरेदी व विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेले गैरव्यवहारही बाहेर काढणार आहोत.'' पदाची सुत्रे स्वीकारताना वाघेरे व काटे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका सुलक्षणा धर, वैशाली काळभोर, विशाल वाकडकर, फजल शेख आदी उपस्थित होते. दरम्यान, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी आमदार विलास लांडे यांनी मिसाळ यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. 

 

पहिल्यांदाच पूजा विधी 
महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासात एखाद्या पदाचे सूत्र स्वीकारताना त्या कक्षातच पूजा विधी करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याची चर्चा रंगली. महापौर, पक्षनेता, स्थायीसह अन्य विषय समित्यांचे सभापतीपद स्वीकारलेल्या कोणत्याही नेत्याने आजपर्यंत विधी केलेला नाही, असेही काहींनी सांगितले. 

 

आज पदभार स्वीकारला आहे. चार वर्षांपूर्वी विठ्ठल मूर्ती खरेदीत 25 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमच्यावर झाल्याने महापालिकेतील सत्ता गमवावी लागली. आता कोट्यवधींचे गैरव्यवहार सुरू आहेत. ते बाहेर काढणार आहे. पुन्हा सत्ता मिळविण्याच्या उद्दिष्ट्याने काम करणार आहे. 
- राजू मिसाळ, विरोधी पक्षनेता, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Misal of NCP as Leader of Opposition