सामर्थ्यवान नेता

Raju-Misal with Ajit Pawar
Raju-Misal with Ajit Pawar

झिजते चंदन स्वतः, अन्‌ सुगंधीत दिशा दाही 
प्रत्यय त्यांच्या कर्तृत्वाचा, इथेही तसाच काही...

एकाच वेळी विविध आघाड्यांवर यशस्वीपणे कार्यरत रहातो, तोच खरा कार्यकर्ता आणि अशा कार्यकर्त्यांना  प्रोत्साहित करीत, त्यांना प्रेमाने फुलवित उमेदीने पुढे घेऊन जातो, तोच समर्थ नेता. अशा दुर्मिळ नेत्यांपैकी प्रत्येकाला विशेषतः तरुणांना हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार. प्रामाणिक आणि रोखठोक कार्यप्रणाली, प्रखर चिकाटी, महाराष्ट्राच्या ठायी निष्ठा आणि अथक परिश्रमातून ध्येयापर्यंत पोचण्याची हातोटी, अशा सद्‌गुणांमुळेच दादांची आजवरची कारकीर्द आम्हा सर्वांना भावली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आजवरच्या वाटचालीत  नकाराला होकारात परावर्तीत करून त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला अजितदादांनी दिलासा दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे काम करत असताना आम्हा तरुण कार्यकर्त्यांमध्ये अजितदादांची क्रेझ होती. या आपल्या तरुण नेत्याला प्रत्यक्ष भेटण्यास कार्यकर्ते उत्सुक असतं. तसाच मी ही दादांच्या थेट भेटीसाठी उत्सुक होतो. हा योग मला माझ्या एका छोट्या कार्यक्रमाच्या निमित्त आला. आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात मी नेत्यांच्या स्वागतासाठी स्वखर्चाने उभारलेल्या होर्डिंगच्या उद्‌घाटनासाठी अजितदादा आले होते. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमासाठी अजितदादांनी येणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या भेटीचा वेगळाच अनुभव होता. या कार्यक्रमामुळे मला पक्ष संघटनेचे काम करण्यास अधिक उत्साह आला. त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी तरुणाईला संधी दिली. त्यात मी ही एक लाभार्थी ठरलो. मात्र, या निवडणुकीसाठी मला अतिशय नाट्यमयरित्या उमेदवारी मिळाली. येथील एका जागेच्या उमेदवारीसाठी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी अजितदादांकडे विनंती केली होती.

त्यामुळे माझी उमेदवारी अडचणीत आली होती. परंतु, स्थानिक नगरसेवक आर. एस. कुमार यांच्या आग्रहामुळे अजितदादांनी अगदी अखेरच्या क्षणी मला पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. त्यांचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही. अजितदादांचं मार्गदर्शन, त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांप्रती जगविलेला विश्‍वास, घेतलेली मेहनत यामुळे मी प्राधिकरण प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्याने त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो. 

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक हाती सत्ता मिळविण्यात अजितदादांच्या सिंहाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी घालून दिलेल्या शिस्तीने नागरीसेवेचे कार्य पाहून त्यांनी माझ्यासारख्या नवख्या नगरसेवकावर क्रीडा समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी सोपविली. त्यावेळी विविध क्रीडा स्पर्धांप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच हिंदुस्थान - पाकिस्तान ही कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा मान मला मिळाला. या स्पर्धेच्यावेळी आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारसाहेब तसेच स्वतः अजितदादा यांची खास उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे नेटके आयोजन पाहून अजितदादांचा माझ्यावरील विश्‍वास अधिक वाढला. त्यामुळे सलग दोन वर्षे मला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभागाचे अध्यक्षपद मिळाले.

अजितदादांनी निव्वळ बोलणारे नगरसेवक आवडत नाहीत. तर शहरातील विकास कामांवर लक्ष केंद्रित करून गतीने काम करणारे नगरसेवक आवडतात. हे माझ्या लक्षात आले होते. ते लक्षात घेऊन  क्रीडा समितीचा सभापती म्हणून शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी विविध उपक्रमांबरोबरच स्पर्धा आयोजित करण्यात मी पुढाकार घेतला. तर  ‘अ’प्रभाग अध्यक्ष या नात्याने प्राधिकरणातील तसेच अ प्रभागांतर्गत येणाऱ्या परिसराच्या विकासासाठी विविध प्रकल्प उभारण्यासाठी कामे करण्यावर भर दिला.

त्यामुळे या आकुर्डी, निगडी परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने आदी अनेक विकास कामे करता आली. माझ्या प्रभागातील  नागरी कामांबरोबरच पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाला भूषणावह ठरेल, असे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान (गणेश तलाव) विकसित करण्याच्या कामामुळे अजितदादांनी माझे कौतुक केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत दादांनी मला पुन्हा संधी दिली. त्यासाठी दादांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामेच बोलली. प्राधिकरणातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा  गड आम्ही अबाधित राखला. या निवडणुकीत विजयी झाल्यावर अजितदादांच्या आशीर्वादाने मला पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौरपद मिळाले. मी या शहराचा उपमहापौर होईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, त्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्यावेळी सकाळी सव्वासहाच्या सुमारास मला फोन करून, ‘तुला मी उपमहापौर करतोय,’ असे सांगून त्यांनी धक्का दिला. या पदासाठी इतरही काही जण इच्छुक असल्याने माझी निवड सहज व्हावी, यासाठी ते दिवसभर पाठपुरावा करत होते.  त्यांच्यामुळे मला अडीच वर्षे उपमहापौरपदाची संधी मिळाली. या कालावधित माझा अजितदादांशी अधिक निकटचा संबंध आला. पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित मंत्रालयातील बैठकांसाठी ते मला आवर्जून निमंत्रण देत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी ओळख करून देताना, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तसा हा माझ्या शहराचा उपमहापौर आहे, असे ते पाठीवर हात ठेवून सांगत.     
आज पिंपरी-चिंचवड शहरात जी काही विकासकामे होत आहेत त्याचे सारे श्रेय अजितदादांच्या कल्पक दृष्टीला, शिस्तबद्ध कार्यालाच जाते. कर्तृत्वाने ओळख, हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे. माणसे जोडून, त्यांच्या यशातच आपले यश शोधणे हाच त्यांचा खरा आनंद आहे. आयुष्यात किती पावसाळे पाहिले यापेक्षा त्या पावसात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात. सामाजिक क्षेत्रात काम करताना माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे, असं ते सांगतात.

एवढं सगळ देवूनही मध्यंतरी झालेल्या राजकीय वादळात अनेक अतिमहत्वाकांक्षी लोक वादळाला घाबरून सैरावैरा पळाले. त्यांना कळाले नाही की वादळ ज्या वेगाने येते, त्याच वेगाने ते निघूनही जाते. हा निसर्गाचा नियम आहे. अशा वेळी मी मात्र पक्ष आणि दादांच्या विश्वास यांना तडा न जाऊ देता दादांबरोबर खंबीरपणे उभा राहिलो. अजितदादा पवार म्हणजे... कर्तव्य आणि कर्तृत्वाच्या मुशीतून तावून सलाखून निर्माण झालेले बावन्नकशी सोने! कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते.. अशा नेत्याचे नाव अजितदादा पवार!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com