esakal | अ‍ॅम्ब्युलन्संचे दरपत्रक आरटीओकडून जाहीर; रुग्ण व नातेवाइकांची लूट थांबणार

बोलून बातमी शोधा

Ambulance

अ‍ॅम्ब्युलन्संचे दरपत्रक आरटीओकडून जाहीर; रुग्ण व नातेवाइकांची लूट थांबणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तातडीच्या प्रसंगी रुग्णांना घरून रुग्णालयापर्यंत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयापर्यंत किंवा रुग्णालयातून घरापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपयुक्त ठरत आहेत. मात्र, कोरोनामुळे आणीबाणीच्या प्रसंगी काही खासगी रुग्णवाहिका चालक-मालकांकडून प्रमाणापेक्षा अधिक भाडे आकारणी केली जात असून, रुग्ण व कुटुंबीयांची आर्थिक लूट सुरू आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णवाहिकांनी रुग्णांना ने-आण करण्यासाठी किती दर आकारावेत? याचे पत्रक पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केले आहे.

सध्या रुग्णांना तासाला एक हजार ते तीन हजार रुपये दर आकारला जात आहे. कोरोनामुळे निधन झाल्यास शव दहनासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यानुसार मृताच्या कुटुंबीयांना रुग्णवाहिकेला तासाला एक हजार रुपयाप्रमाणे पैसे द्यावे लागत आहेत. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी रुग्णवाहिका दरपत्रकाबाबत आदेश काढला आहे. जे रुग्णवाहिका मालक-चालक ठरवून दिलेल्या भाडेदरापेक्षा जास्त दर आकारणी करतील, अशा वाहनधारकाची तक्रार वाहन क्रमांकासह mh14@mahatranscom.in या ई-मेल आयडीवर करावी. अशा तक्रारीची नोंद घेऊन त्यांच्यावर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. आरटीओने जाहीर केलेले दरपत्रक रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस नागरिकांना दिसेल, अशा दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. सर्व रुग्णवाहिका चालक-मालक संघटना, रुग्णालयांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती ओळखून रुग्णसेवा करावी व कोणत्याही रुग्णांकडून अतिरिक्त भाडे आकारणी करण्यात येऊ नये, असे आवाहनही आदे यांनी केले आहे.

हेही वाचा: कोथरुडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळतोय मानसिक ओलावा

रुग्णवाहिका दरपत्रक (रुपयांत)

रुग्णवाहिका प्रकार/ दर २५ किलोमीटर अथवा दोन तास/दर प्रतिकिलोमीटर /प्रतिप्रतिक्षा तास

 • मारुती व्हॅन / ५००/ ११/१००

 • सुमो, मेटॅटोरसारखी वाहने/६००/१२/१२५

 • टाटा ४०७, माझ्दा सारखी वाहने /९००/१३/१५०

रुग्णवाहिकांसाठी अटी व शर्ती

 • भाडेदर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी लागू

 • भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी आहेत

 • २५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी प्रतितासप्रमाणे भाडे वाढ ठरेल

 • दरपत्रक रुग्णवाहिकेत आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे

 • प्रवास न करता वाहन उभे असल्यास प्रत्येक तासासाठी प्रतीक्षा दर लागू

 • प्रस्तावित कमाल भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारू नये

 • रुग्णवाहिकेला जीपीएस प्रणाली आवश्यक

 • प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण आवश्यक

 • मोटार वाहन कायदा व तरतुदीनुसार वेळोवेळी लागू होणारे नियम व अटी लागू

 • सर्व रुग्णवाहिका वातानुकूलित ग्राह्य आहेत

 • रुग्णाच्या विनंतीनुसार वातानुकूलित यंत्रणा चालू अथवा बंद ठेवता येईल

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे