esakal | रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्याबाजाराने विकणारा जेरबंद

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर
रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्याबाजाराने विकणारा जेरबंद
sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : कोरोना उपचारावरील रेमडेसीव्हीर इंजेक्शन काळ्याबाजाराने विकणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड पोलिसांचे सामाजिक सुरक्षा पथक व अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई भोसरीतील इंद्रायणीनगर येथे करण्यात आली.

कृष्णा भास्कर हावणे (वय २७, रा.बिरासाहेब रुपनर हॉस्पिटल, इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ-बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक भाग्यश्री जाधव यांनी फिर्याद दिली आहे. एक जण रेमेडीव्हीर इंजेक्शन जादा दराने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस व अन्न-औषध प्रशासनाने भोसरीतील एमआयडीसीतील तिरुपती बालाजी चौकात सापळा रचला.

हेही वाचा: ‘पंच’नामा : खरा तो एकची धर्म...

बनावट ग्राहक तयार करून त्या ग्राहकामार्फत आरोपीकडे इंजेक्शनची मागणी करण्यात आली. त्यानुसार आरोपीने एका इंजेक्शनची किंमत सोळा हजार रुपये सांगितली. त्यानंतर तो तीन इंजेक्शन घेऊन आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच हजार ४०० रुपयांचे एक व तीन हजार ४९० रुपये किमतीचे दोन इंजेक्शन असे एकूण तीन इंजेक्शन आढळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन तो रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत असलेल्या इंद्रायणीनगर येथील बीआरएम हॉस्पिटल मधील केसर मेडिकल मधून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तीन इंजेक्शनसह मोबाईल व रोकड असा एकूण ३१ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: ‘गोष्टी युक्तीच्या चार’, कोरोना झाला तरी रहा ‘पॉझिटिव्ह’