esakal | ‘पंच’नामा : खरा तो एकची धर्म...

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘‘आजी, आता तू आमच्याबरोबर घरी चलायचं. ‘ससून’मध्ये तू जशी रोज प्रार्थना आणि गाणी म्हणायचीस ना, तसं आम्हाला शिकवायचं.’’

‘पंच’नामा : खरा तो एकची धर्म...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड-सकाळ वृत्तसेवा

‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या सानेगुरुजींच्या प्रार्थनेने ‘ससून’मधील कोरोना रुग्णांचा एक वॉर्ड उत्साही झाला होता. सत्तर वर्षीय साबणे आजी गेल्या ३५ दिवसांपासून आपल्या खणखणीत आवाजात ही प्रार्थना रोज म्हणत होत्या. त्यामुळे या वॉर्डमध्ये कमालीचे चैतन्य पसरले जायचे. येथील प्रसन्न वातावरणामुळेच आम्ही बरे झालो, अशी अनेकांनी भावना व्यक्त केली होती. साबणेआजींनाही एक- दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार होता. त्यामुळे तेथील रुग्णांच्या एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासू होते.

हेही वाचा: चिंता वाढवणारी आकडेवारी; भारतात आढळले जगातील सर्वाधिक रुग्ण

साबणेआजी प्राथमिक शिक्षिका म्हणून दहा वर्षापूर्वी निवृत्त झाल्या होत्या. धाकटी मुलगी दोन वर्षांची असताना त्यांच्या पतीचे निधन झाले होते. मात्र, या संकटाने न खचता त्यांनी दोन मुलगे व एक मुलीला उच्चशिक्षित करून, त्यांचे आयुष्य मार्गी लावले होते. मुलांचे संगोपन, नोकरी अशी तारेवरची कसरत करत, अनेक अडचणींवर मात करीत, त्यांनी मुलांना वाढवले होते. निवृत्तीनंतरचे सुरवातीचे दिवस त्यांचे बरे गेले होते. मात्र, माझ्या मुलांना ‘मराठी गाणी’, ‘प्रार्थना’ आणि ‘शुभंकरोती’ सारखे काही शिकवू नका’, असे म्हणून एका सुनेने त्यांच्याशी भांडण काढले होते, तर 'तुम्ही आमच्या संसारात लुडबूड करू नका’ असे म्हणत दुसऱ्या सुनेने त्यांना अपमानित केले होते. तर आयटीतील नोकरीमुळे मुलीला आईशी बोलायलाही वेळ मिळत नव्हता.

त्यामुळे साबणेआजी दिवसेंदिवस एकाकी पडू लागल्या. मानसिकदृष्ट्या खचू लागल्या. त्यामुळे नाइलाजाने एके ठिकाणी त्या भाड्याने खोली घेऊन राहू लागल्या. मिळणाऱ्या पेन्शनवर दिवस ढकलू लागल्या. मात्र, नातवंडांच्या आठवणीने त्या अस्वस्थ होऊ लागल्या. त्यांच्या भेटीसाठी तळमळू लागल्या. ‘माझ्या नातवंडांना लांबून तरी पाहू द्या’ अशी विनवणी त्या सुनांना करायच्या. पण त्यांची विनंती फेटाळली जायची. काही दिवसांनी आजींना कोरोना झाल्याचे निदान झाले आणि ‘ससून’मध्ये त्या स्वतःच ॲडमिट झाल्या.

हेही वाचा: आदित्य ठाकरेंनी डिलीट केलेल्या ट्विटवर संजय राऊत म्हणतात...

साबणेआजींची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यावेळी त्या सोहम, पार्थ, नीलिमा या नातवंडांना झोपेतही सतत हाका मारू लागल्या. ‘बाळांनो, फक्त एकदाच भेटा रे’ असे म्हणू लागल्या. हे दृश्‍य पाहून शेजारील रुग्णांच्या व डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी यायचे. ‘आजी, तुम्ही बरे व्हाल, काळजी करू नका’ या डॉक्टरांच्या धीराच्या बोलण्याने त्यांनी उभारी धरली. योग्य औषधोपचाराचाही त्यांना फायदा झाला. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती सुधारू लागली. मग मात्र इतर कोरोना रुग्णांमध्येही आपण जिद्द आणि उमेद जागवायची हे आजींनी ठरवले. शाळेतील रोजची प्रार्थना त्यांना ससूनमध्ये उपयोगी पडली. काही दिवसांतच आजीमुळे तो संपूर्ण वॉर्ड एक कुटुंब झाला होता. आजींविषयी सगळ्यांच्याच मनात जिव्हाळा आणि आत्मीयता निर्माण झाली होती.

हेही वाचा: पृथ्वीचं बाह्यरुप पाहिलंय? ISS ने शेअर केलेला व्हिडीओ पाहाच

साबणेआजींचा उद्या डिसचार्ज होता. त्यामुळे आदल्या दिवशीच सगळ्या रुग्णांनी स्टाफच्या मदतीने वॉर्डला फुलांनी आणि फुग्यांनी सजवले होते. त्या दिवशी अनेक रुग्णांनी आजींविषयी कृतज्ञता व्यक्त करीत, अश्रूंना मोकळी वाट करून दिली. एका रुग्णाने याचे मोबाईलवर व्हिडिओ शुटिंगही करून, सोशल मीडियावर व्हायरल केले. दुसऱ्या दिवशी आजींना निरोप देण्यासाठी रुग्णांबरोबरच सगळा स्टाफ आला होता. या प्रेमाने आजी भारावून गेल्या. जड अंतः करणाने त्या ‘ससून’ची पायरी उतरू लागल्या. गेटजवळ गेल्यानंतर समोरचे दृश्‍य पाहून, त्यांना गहिवरून आले. त्यांची दोन्ही मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे गेटजवळ उभे राहून, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत करीत होते. ‘‘आजी, आता तू आमच्याबरोबर घरी चलायचं. ‘ससून’मध्ये तू जशी रोज प्रार्थना आणि गाणी म्हणायचीस ना, तसं आम्हाला शिकवायचं.’’ पार्थच्या या बोलण्यावर आजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.