सत्काराला बोलावलं अन् पदाधिकारीचं गायब

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सत्कारासाठी निमंत्रित केले होते. मात्र, महापौर, पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगावर मीटिंग सुरू झाल्याने तब्बल तीन तास कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली.

पिंपरी : महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सत्कारासाठी निमंत्रित केले होते. मात्र, महापौर, पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगावर मीटिंग सुरू झाल्याने तब्बल तीन तास कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे 'नको आम्हाला तुमचा सत्कार' असे म्हणण्याची वेळ वैतागलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर आली. 

'बीएसएनएल है, तो भरोसा है' असं म्हणणाऱ्या 'बीएसएनएल'कडूनच ग्राहकांना मनस्ताप

महापालिकेच्या वैद्यकीय, शिक्षण, भांडार, सुरक्षारक्षक, उद्यान अशा विभागातील सेवानिवृत्त झालेल्या 20 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरले. त्यांना सत्काराचे ठिकाण, वेळ, कोणाच्या हस्ते होणार याची माहिती कळविली. या कर्मचाऱ्यांना तसा मोबाईलवर मेसेज आणि निमंत्रण पत्रिका पाठवून महापालिकेच्या भवनात उपस्थित राहण्यास सांगितले होते. सत्कारमूर्ती कर्मचारी दिलेल्या वेळेआधी आणि ठरलेल्या ठिकाणी हजर झाले. दुपारची बारा वाजेची वेळ सत्कारासाठी ठरवली होती. परंतु, दुपारचे अडीच वाजले, तरी पदाधिकाऱ्यांचा पत्ताच नाही. महापालिकेच्या पवळे सभागृहात तीन तास थांबून कर्मचारी वैतागून गेले. काहींनी तर वैतागून एकमेकांचा सत्कार करून निघून गेले. 20-35 वर्षे काम करूनही प्रशासनाकडून निवृत्तीच्यावेळी अशी अवहेलना करण्यात आल्याची खदखद काहींनी पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्‍यक असल्याचे सांगत कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना सुनावले. 

#JusticeForKaku : दीड हजार अन् तीनशे दिले, अठराशे नाही दिले, तुम्हाला तरी जमतोय का हिशोब ? (व्हिडिओ)

दरम्यान, महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, भांडारपाल रवींद्र सिंदकर, संभाजी गावडे, मुख्य लिपिक मच्छिंद्र कुंभार, दिलीप नेमाडे, परिचारिका साधना चव्हाण, सहाय्यक उद्यान अधीक्षक शरद बगाडे, उपशिक्षिका सीता पांढरे, मजूर महादेव लोंढे, रखवालदार बाळू शिंदे, साईदास जगताप, मुकादम महादेव पवार, तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या उपशिक्षिका स्मिता कोठावळे आणि सफाई कामगार शकुंतला विटकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: retired employees felicitated after a three-hour wait by pimpri chinchwad municipal corporation