माणुसकी ! सापडलेले पाच तोळे दागिने दिले परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकी ! सापडलेले पाच तोळे दागिने दिले परत

माणुसकी ! सापडलेले पाच तोळे दागिने दिले परत

देहूरोड : कोरोना परिस्थितीमुळे सध्याच्या काळात जगणे मुश्किल झाले आहे. काही जणांचे रोजगार हिरावले आहेत. अशाही परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करणारे काहीजण समाजात आहेत. त्यामुळे समाजाची बांधिलकी, चांगुलपण टिकून आहे. याचे उदाहरण देहूरोड येथे गुरुवारी(ता.11) दिसून आले. देहूरोड येथील सेंट्रल चौकातील एसटी स्टॅन्डमधील एका उपहारगृहात सापडलेले पाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख तीन हजार रुपयांची रक्कम एका प्रवाशी ग्राहक महिलेला उपहारगृहाचे मालकाने परत दिले.

हेही वाचा: CM योगी आदित्यनाथ यांना लॅपटॉपही वापरता येत नाही - अखिलेश यादव

भाऊबीजेसाठी लोणावळा येथील सुनिता जाधव या आपल्या लहान मुलांसह दिघी येथे माहेरी गेल्या होत्या. माहेरहून परत येताना त्या व त्यांचे पती देहूरोड येथील सेंट्रल चौकातील पुणेरी मिसळ या उपहारगृहात चहा पिण्यासाठी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास थांबल्या. लोणावळ्याडे जाणारे वाहन आल्यामुळे त्या त्यांच्या कुटुंबासह उपहारगृहातून बाहेर पडल्या. मात्र जाताना त्या आपली पिशवी विसरल्या. ही पिशवी उपहारगृहातील संतोष शेलार आणि सोमनाथ बुधे या कामगारांना सापडली.त्यांनी पिशवीचे मालक शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही आले नाही.पिशवीमध्ये मालकाचा पत्ता असेल म्हणून उघडून पाहिली. तर त्यात पाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तीन हजार रुपये असा एेवज होता. मात्र पत्ता नव्हता.

हेही वाचा: भारत-पाकमधील गोडव्यासाठी ICC धडपडणार नाही, कारण...

दरम्यान, पिशवी विसरून गेलेले सुनिता जाधव व त्यांच्या पतीने देहूरोड येथे नातेवाईकांना फोन करून पिशवी सेंट्रल चौकात उपहारगृहात आहे का पहाण्याची विनंती केली. त्यानुसार नातेवाईकांनी उपहारगृहाचे मालकाकडे चौकशी केली. त्यावेळी मालकाने सुनिता जाधव व त्यांच्या पतीबरोबर चर्चा केली. तसेच पिशवीतील तपशिल बरोबर असल्यामुळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम परत केली. याबाबत उपहारगृहाचे मालक संतोष शेलार व सोमनाथ बुधे यांनी सांगितले, विसरलेली पिशवीत सोन्याचे दागिने होते. तसेच रोख रक्कमही होती.पत्ता सापडत नव्हता. देहूरोडमधील त्यांचे नातेवाईक आले. संबंधित महिलेबरोबर चर्चा केली. खात्री पटल्यानंतर सोने आणि पैसे परत केले.महिलेने आम्हांला आशिर्वाद दिले. त्यातच आम्हाला समाधान आहे.

loading image
go to top