Pimpri News : ‘आरएमसी प्लॅंट’ ठरताहेत डोकेदुखी; प्रदूषणाने नागरिकांच्या आरोग्याला त्रास

बांधकामांसाठी आवश्‍यक ‘रेडीमिक्स कॉंक्रिट’चा पुरवठा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी ‘आरएमसी प्लॅंट’ उभारले जात आहेत.
rmc plot
rmc plot Sakal

- अश्‍विनी पवार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, घरांची मागणी वाढल्याने बांधकाम व्यवसायालाही चालना मिळत आहे. या बांधकामांसाठी आवश्‍यक ‘रेडीमिक्स कॉंक्रिट’चा पुरवठा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी ‘आरएमसी प्लॅंट’ उभारले जात आहेत.

शहरात होणारे प्रदूषण लक्षात घेता ‘आरएमसी प्लॅंट्स’ हे शहराबाहेर असणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रशासनाकडून शहरातील मध्यवस्तीतही या प्लॅंट्सला परवानगी दिली जात आहे. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या त्रासामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.

शहरात नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या भागात सिमेंट कॉंक्रिटची गरज भासते. त्यामुळे शहरातील पुनावळे, ताथवडे, मारुंजी या परिसरासोबतच रावेत,

चिंचवडसारख्या मध्यवर्ती भागातही ‘आरएमसी’ उभारले जात आहे. मात्र, यामुळे आधीपासून या परिसरातील नागरिकांना प्लॅंटमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरएमसी प्लॅंटसाठी परवानगी देताना नियम पाळले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

आरएमसी प्लॅंटमध्ये व्यावसायिक व ‘कॅप्टिव्ह’ असे दोन प्रकार येतात. अनेकदा इमारतीचे काम सुरू असताना त्याच्या आवारात ‘आरएमसी’ उभारले जातात. अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या आरएमसीला ‘कॅप्टिव्ह’ असे संबोधले जाते. अशा प्लॅंटसाठी परवानगी देताना अंतराची कोणतीही अट नसल्याने मध्यवस्तीतील बांधकामांच्या ठिकाणीही ‘आरएमसी प्लॅंट’ उभारण्यास काही अटी-शर्थींसह परवानगी दिली जाते. मात्र, या व्यावसायिकांकडून नियम पाळले जात नसल्याची तक्रार रहिवासी करत आहेत.

त्रास काय होतो...

आरएमसी प्लॅंटमधून मोठ्या प्रमाणात धुलीकण बाहेर पडतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्‍वसनाचे विकार होत आहेत. सतत या धुळीच्या संपर्कात आल्याने अगदी निरोगी व्यक्तींनी सुद्धा ब्रोकांयटीस, दमा यांच्यासारखे आजार उद्‍भवू शकतात.

विशेषतः वृद्ध व लहान मुलांमध्ये हे आजार उद्भवण्याचा धोका जास्त आहे. आवाजाचाही परिसरातील नागरिकांना त्रास होत असतो. तर वाहतूक करणाऱ्या ट्रक, डंपरमुळे उडणाऱ्या धुळींचाही परिसरातील नागरिकांना त्रास होतो.

काय आहेत नियम

  • शाळा व महाविद्यालयांपासून दोनशे मीटर एवढे अंतर असावे

  • एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वस्तीपासून शंभर मीटर अंतर असावे

  • मटेरिअल हॅंडलिंगचे बेल्ट हे बंदिस्त असावेत

  • डस्ट कलेक्शन सिस्टिम असणे आवश्‍यक

  • रोजच्या रोज या प्लॅंटची स्वच्छता करणे गरजेचे

  • या प्लॅंटमध्ये वॉटर स्प्रिकलिंग सिस्टिम कार्यान्वित असावी

  • माल बाहेर नेणाऱ्या ट्रकचे टायर धुण्यासाठी वॉशिंग सिस्टिम असावी

  • ध्वनी प्रदूषणाची पातळी ७५ डेसिबलच्या कमी असावी

  • या प्लॅंटमधील काम दिवसाच सुरू असावे

आमच्या परिसरात असणाऱ्या आरएमसी प्लॅंटमुळे नागरिकांमध्ये श्‍वसनाचे त्रास, दमा यांच्यासारखे आजार उद्‍भवत आहेत. सध्या उपनगरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नियमांमध्येही नागरिकांचे हित लक्षात घेऊन बदल करणे आवश्‍यक आहे.

- प्राजक्ता रुद्रवार, सदस्या, रावेत किवळे हाउसिंग फेडरेशन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आरएमसी प्लॅंटला परवानगी दिली जाते. कोणत्याही परवानगी द्यायच्या आधी संबंधित जागेची पाहणी केली जाते. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमावलीचे पालन करणे आवश्‍यक आहे.

- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग

शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने बांधकामांचाही वेग वाढत आहे. त्यामुळे आरएमसी प्लॅंटची संख्या वाढत आहे. मात्र, यासाठी आम्ही अनेक निकष ठरवून दिलेले आहेत. कॅप्टिव्ह प्रकारातील प्लॅंट बांधकामाच्या ठिकाणीच उभारण्यात येत असल्याने त्यासाठी अंतराची अट नसते. मात्र, इतर सर्व निकष पडताळूनच आम्ही परवानगी देतो.

- मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com