तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुतर्फा अडीच मीटर विस्तारीकरण;लवकरच कामाला सुरुवात 

तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुतर्फा अडीच मीटर विस्तारीकरण;लवकरच कामाला सुरुवात 

तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुतर्फा अडीच मीटर विस्तारीकरण करणार असून, मावळ तालुका हद्दीत वडगाव फाटा ते सुधा पुलापर्यंत अठरा मीटर चौपदरी डांबरी रस्त्याचे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या विधिमंडळातील पुरवणी मागणीअंतर्गत मंजूर सहा कोटींच्या निधीतून हे काम लवकरच सुरू होणार आहे. 

"तळेगाव-चाकण मार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा!' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये रविवारी (ता. 27) वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आमदार शेळके यांनी दुसऱ्याच दिवशी सोमवारी (ता. 28) राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागासह तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर, उपअभियंता वैशाली भुजबळ, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, उपअभियंता गोरक्ष गवळी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता संदीप पाटील, नगर अभियंता शरद पाटील, पीएमआरडीएचे विष्णू आवाड, वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश पवार, संदीप शेळके, संजय बाविस्कर, अनिकेत भेगडे, कृती समितीचे दिलीप डोळस, अमित प्रभावळकर बैठकीस उपस्थित होते.

केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून नियोजित 12 मीटर रुंदीच्या 300 कोटींच्या सिमेंट रस्त्याचा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याने स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. त्याऐवजी किमान अठरा मीटर चौपदरी रस्त्याचे काम योग्य ठरेल, अशी सूचना देशपांडे यांनी मांडली. त्यामुळे आता बारा मीटर सिमेंट रस्त्याऐवजी अठरा मीटर चौपदरी रस्त्याचा सुधारित प्रस्ताव केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, सुधारित प्रस्तावाच्या कामाला लागणारा संभाव्य कालावधी लक्षात घेता, तातडीची उपाययोजना म्हणून शेळके यांनी आपल्या विधिमंडळातील पुरवणी मागणी अंतर्गत मंजूर झालेल्या सहा कोटींच्या निधीतून अस्तित्वातील रस्त्याच्या दुतर्फा अडीच मीटर विस्तारीकरण काम युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव फाटा ते सुदुंबरे येथील सुधा पूल या बारा किलोमीटर टप्प्यात मावळ तालुका हद्दीत नवीन भूसंपादन न करता अतिक्रमणे काढून रस्त्याचे दुभाजकासह अठरा मीटर रस्त्यात विस्तारीकरण केले जाणार आहे. विस्तारीकरणास अडसर ठरणारे तळेगाव नगरपरिषद हद्दीतील रस्त्याकडेचे विजेचे खांब हटविण्याच्या सूचना नगरपरिषदेला करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. निविदा आणि इतर शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर साधारणतः महिन्याभरात या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा अंदाज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या बारा किलोमीटरच्या टप्प्यात चौपदरीकरण आणि दुभाजक झाल्यास नित्याच्या वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. 

आमदारांकडून रस्त्याची मोजणी  
तळेगाव-चाकण राज्य मार्गाची नेमकी रुंदी किती? याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार सुनील शेळके हे स्वतः अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह तिकडे घेऊन गेले. वडगाव फाटा ते मराठा क्रांती चौकापर्यंत दोन किलोमीटरच्या टप्प्यात विविध ठिकाणी टेप हातात घेऊन रस्त्याची रुंदी त्यांनी मोजून पाहिली आणि अठरा मीटर विस्तारीकरणास फारशी अडचण नसल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरपरिषद हद्दीत काही ठिकाणी भूसंपादन करण्याची गरज पडल्यास वाढीव चटई क्षेत्र अथवा टीडीआर देता येईल का? याची चाचपणीही शेळके यांनी अधिकाऱ्यांसोबत केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com