भोसरीकरांनो सावधान! लॅाकडाउनचं उल्लंघन कराल, तर... 

भोसरीकरांनो सावधान! लॅाकडाउनचं उल्लंघन कराल, तर... 

भोसरी : सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीपासून २३ जुलैपर्यंत लॅाकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या लॅाकडाउनच्या नियमाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे संदेश देत भोसरी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता भोसरी परिसरातून संचलन केले. या संचालनाद्वारे लॅाकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचाही संकेत दिला आहे.

केंद्र सरकारने वेळोवेळी घोषित केलेल्या लॅाकडाउनच्या काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे भोसरी परिसरात लॅाकडाउन यशस्वी झाले. लॅाकडाउन शिथिल झाल्यावर महापालिकेने दुकाने सुरू करण्यासाठी ग्राहक आणि दुकानदारांना काही नियमांचे बंधन घातले होते. यामध्ये ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सॅनिटाझरचा उपयोग करणे, कोरोना पसरू नये यासाठी काळजी घेणे, तोंडाला मास्क लावणे आदी काही नियम होते. भोसरीतील बहुंतांश नागरिक तोंडाला मास्क लावलेले दिसून येतात. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हे त्यांना वावगे वाटत आहे. त्यामुळे खरेदी करताना नागरिक बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली देतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेने गुरुवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. मात्र, पोलिस बंदोबस्त ठेवला नव्हता. त्यामुळे भोसरीकरांनी या जनता कर्फ्यूकडे काणाडोळा केला. त्याचप्रमाणे लॅाकडाउन शिथिल झाल्यानंतर दुकाने ही सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केलेले असतानाही पाचनंतरही दुकाने सुरूच ठेवलेली दिसून आली. दररोज पाचनंतर पोलिसांचे वाहन परिसरात आल्यावरच दुकानदार दुकाने बंद करत असल्याचेही दिसून आले. याला काही दुकानदार अपवादही आहेत.

त्याचप्रमाणे आता १३ ते २३ जुलैपर्यंत लागू केलेल्या लॅाकडाउनमुळे भोसरीत नागरिकांनी किराणा मालासह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. तसेच, सोमवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र, भोसरी परिसरातील काही दुकानदारांनी सायंकाळी सातनंतरही दुकाने सुरू ठेवली होती. पीएमटी चौक, दिघी रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता आदी भागांवर सातनंतरही भाजी विक्रेते बसलेले दिसले. त्यामुळे आताच लॅाकडाउन भोसरी परिसरात यशस्वी करायचा असेल, तर पोलिसांचा चोख बंदोबस्तांची मागणी सजग नागरिकांमधून होत होती. या पार्श्वभूमिवर लॅाकडाउनच्या पूर्व संध्येला भोसरी पोलिसांनी भोसरी परिसरात पोलिसांचे संचलन करत उल्लंघन करणाऱ्यांना इशारा दिला आहे. भोसरी पोलिसांद्वारे आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीएमटी चौक, भोसरी गावठाण, पीसीएमसी चौक आदी भागांतून संचलन करत लॅाकडाउनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
   
नागरिकांनी लॅाकडाउन काळात घरीच रहावे

कोणीही घराबाहेर पडू नये. लॅाकडाउन कालामधीमध्ये फक्त दूध आणि औषधांची दुकानेच फक्त सुरू राहणार आहेत. दूध केंद्रेही फक्त सकाळीच सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी भाजी व किराणामाल घेण्यासाठी घराबाहेर पडू नये. लॅाकडाउनच्या सर्वच नियमांचे पालन करत नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. मात्र, लॅाकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर भोसरी पोलिसांद्वारे कडक कारवाई करण्यात येईल.
- शंकर औताडे, वरिष्ठ निरीक्षक, भोसरी पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com