आरटीई प्रवेशासाठी किती दिवस वेटिंग?, पिंपरी-चिंचवडमधील पालकांचा सवाल 

आशा साळवी
Monday, 21 September 2020

  • मुलांचे वर्ष वाया जाण्याची भीती 

पिंपरी : "आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त असूनही मुलांची वेटिंग लिस्टला नावे कशी, किती जागा रिक्त आहेत, किती जणांचा प्रवेश झाला, याची यादी जाहीर करून आठ दिवसाच्या मुदतीत प्रवेश निश्‍चित करावा. नाहीतर दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा. त्यामुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे निर्णय घेता येतील,'' अशी मागणी पालक नीलेश पोळ यांनी केली. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 984 नवीन रुग्ण

आरटीईच्या 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी 17 मार्चला पहिली सोडत काढण्यात आली. मात्र, कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया काही महिन्यांसाठी स्थगित केली. ऑगस्टमध्ये ती पुन्हा सुरू केली. त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. आता ही मुदतदेखील संपली, तरी अद्याप प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सूचना आली नाही. त्यामुळे पालक चिंतेत आहेत. पोळ म्हणाले, "सातत्याने पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने या प्रक्रियेबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.'' पालक प्रवीण नौकुडकर म्हणाले, "आमच्या मुलांना कधी प्रवेश मिळेल, आरटीईच्या घोळात वर्ष वाया जाईल, अशी भीती वाटते.'' साद सोशल प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कोल्हटकर म्हणाले, "रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतीnल विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित करावा. त्यामुळे आरटीईचा घोळ कमी होईल. अन्यथा प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.'' 

शहरातील स्थिती 

  • शाळा - 179 
  • ऑनलाइन अर्ज - 18 हजार 302 
  • राखीव जागा - 3 हजार 786 
  • प्राथमिक प्रवेश - 2 हजार 32 
  • रिक्त जागा - 1 हजार 754 
  • प्रतीक्षेत - 3 हजार 786 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रतीक्षा यादीतील प्रवेशाकरिता सप्टेंबर अखेरपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे सूचित केले आहे. त्यानुसार सकारात्मक विचार करण्यात येईल '' 
- पराग मुंढे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE admission waiting in pimpri chinchwad