Sakal Kirtan Mahotsav : तणावमुक्तीसाठी नामस्मरणाचा पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा संदेश

पंढरपूर येथील कार्तिकी वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा आणि ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३१ वा वर्धापनदिन यानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे.
purushottam maharaj patil
purushottam maharaj patilsakal

पिंपरी - ‘सध्याच्या काळात प्रत्येकजण तणावात आहे. शंभर टक्के तंदुरुस्त कोणीच नाही. त्यावर एकच औषध आहे, ‘रामकृष्णहरी’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूळमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे,’’ अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.

पंढरपूर येथील कार्तिकी वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा आणि ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३१ वा वर्धापनदिन यानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनसेवा आकुर्डी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींना पुष्प अर्पण करून नतमस्तक होत, त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या,

रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी।

ह्रदयमंदिरीं स्मरा कारे ॥१॥

आपुलिया आपण करा सोडवण।

संसारबंधन तोडी वेगीं ॥२॥

ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्णमाळा ।

ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्तिरया॥३॥...

या अभंगाचे निरूपण केले.

‘सकाळ’मुळे नाट्यगृहांना मंदिराचे स्वरूप

प्रसार माध्यमे अनेक आहेत. पण, आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना केवळ ‘सकाळ’ला सुचली. अशी कीर्तने एरवी मंदिरात होतात. ‘सकाळ’ने ती नाट्यगृहात आणली. नाट्यगृहांना मंदिराचे स्वरूप ‘सकाळ’ने मिळवून दिले. मंदिरातील मं म्हणजे मंगलता, दि म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. ही सर्व मंगलमय दिव्य रम्यता इथे निर्माण झाली आहे.

भागवत महाराज यांचे आज कीर्तन

‘सकाळ’तर्फे आयोजित कीर्तन महोत्सवात मुंबई येथील कीर्तनकार जयेश महाराज भाग्यवंत, बीड येथील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची कीर्तन सेवा झाली आहे. बुधवारी आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी कीर्तनसेवा केली. गुरुवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजता आळंदी येथील कीर्तनकार भागवत महाराज साळुंखे यांचे कीर्तन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होईल. शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाचला मुक्ताईनगर येथील कीर्तनकार विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनसेवेने महोत्सवाचा समारोप होईल.

मनःशांतीसाठी एकमेकांशी बोला

ते म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर माउली यांनी ज्ञानाच्या माध्यमातून सर्वांना उपदेश केला. म्हणून ते वयापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ ठरतात. माउली हे ज्ञानियांचे ज्ञानी आहेत. समाजात चार प्रकारचे लोक असतात. त्यात अज्ञानींमधील अज्ञानी, ज्ञानींमधील अज्ञानी, अज्ञानींमधील ज्ञानी आणि ज्ञानींमधील ज्ञानी असे हे चार वर्ग आहेत. त्यातील चौथ्या वर्गात माऊलींचा समावेश होतो. त्यामुळे वयाने लहान असूनही ते श्रेष्ठ ठरतात.’’ मुक्तपणे आपल्या माणसांजवळ व्यक्त व्हा.

मोकळेपणाने बोला. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो. सध्या आपण घरातल्या घरात बोलत नाहीत. शेजाऱ्यांशी बोलत नाहीत. पण, मनःशांती मिळवण्यासाठी सर्व जुने विसरून एकमेकांशी बोला, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com