Uday Samant : विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘सीईटीपी’ निविदा प्रक्रिया; उद्योगमंत्री सामंत यांची ग्वाही

खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी सलग दहा वर्षे संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा कार्यपूर्ती अहवाल ‘संसदरत्न श्रीरंग आप्पा’ या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले.
sansadratna shrirang appa Performance Report book publication
sansadratna shrirang appa Performance Report book publicationsakal

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे हे राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी औद्योगिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्याचे प्रस्तावित आहे.

दोन वेळा बैठक झाली असून, प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. प्रकल्पाचा सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याचे काम पूर्ण होऊन निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी सलग दहा वर्षे संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा कार्यपूर्ती अहवाल ‘संसदरत्न श्रीरंग आप्पा’ या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १४) काळेवाडीतील रागा पॅलेस सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते.

आमदार महेश लांडगे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर समितीचे बाळासाहेब काशीद, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘‘खासदार झाल्यापासून आप्पा बारणे यांनी सातत्याने इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषणमुक्त करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भात आम्ही चार महिन्यांपूर्वी महापालिकेत बैठक घेतली. इंद्रायणी नदीशी वारकऱ्यांचा संबंध येतो. पण, तिच्या प्रदूषणामुळे वारकऱ्यांना त्रास होतो. नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे.

म्हणून सरकारने कार्यवाही केली पाहिजे, अशी भूमिका आप्पांनी मांडली. त्यावर चार महिन्यांपूर्वी सरकारने निर्णय घेतला आहे. दोन हजार कोटी रुपये आम्ही त्याबाबतच्या प्रकल्पावर खर्च करतोय. तीन वर्षात एमआयडीसी, महापालिका, पीएमआरडीए यांच्या माध्यमातून औद्योगिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात येणार आहे.

त्याचा डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत डीपीआरचे काम सुरू होईल आणि जून-जुलैपर्यंत त्याचे काम संपेल. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदर त्याची निविदा निघेल, अशी ग्वाही मी उद्योगमंत्री म्हणून देतोय.’’

सामंतांकडून आप्पांचे कौतुक

खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे आप्पा, तुम्ही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही, माझं मन सांगतंय की, पुढच्या निवडणुकीलादेखील मोठ्या फरकाने तुम्ही निवडून येणार आहात. आप्पांसोबत उपस्थित राहण्याची संधी अनेक कार्यक्रमांतून मला मिळाली. त्यातून जाणवले की, त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग फक्त पक्षातीलच नसून विविध क्षेत्रातील आहे. विविध पक्षातील आहेत.

आप्पांनी लोकांशी निगडित विकासाची कामे केली आहेत. लोकांची कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीला जपणे ही मतदारांची देखील जबाबदारी आहे. भविष्यात तुम्ही आप्पांना पुन्हा खासदार कराल, याची देखील मला खात्री आहे. आप्पा, लवकरच तुम्ही मला प्रचाराला बोलवाल, अशी मी ग्वाही देतो. माझी भावना सांगतो की, तुमच्यासारखी व्यक्ती पुन्हा खासदार होणे, ही काळाची गरज आहे. मोठ्या मताधिक्याने आपण याल, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

माझ्याकडूनही आप्पांनी लोकांची कामे करून घेतली आहेत. त्यांच्या मावळ मतदारसंघामधील रायगड जिल्ह्यात नुकताच एक मोर्चा गैरसमजातून निघाला होता. रसायनी येथील एका प्रकल्पाला मोर्चेकरांचा विरोध होता. त्यामुळे प्रकल्पाला स्थगिती देणे गरजेचे आहे, कारण तो प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, असा त्यांचा गैरसमज झाला आहे, असे आप्पांनी मला सांगितले.

त्यांच्या आग्रहास्तव चार दिवसांपूर्वी तातडीने आम्ही त्या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे सरकारचे धोरण आहे. अशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भूमिका आहे.

'`मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ते स्वतः कार्यक्रमाला येणार होते. परंतु; सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, लोकसभा निवडणुकीची तयारी, बैठका, जागा वाटप ही कामे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीची असल्यामुळे मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत. पण, त्यांच्या आदेशानुसार मी आलो आहे.

खरोखरच नजर लागण्यासारखा हा कार्यक्रम आहे. तुम्ही केलेली कामे लोकांनी ॲप्रिसिएट केली आहेत. माझ्या रत्नागिरी मतदारसंघात विविध प्रकल्पांची सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजने व उद्‍घाटने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहेत. त्यामुळे मलाही फारसा वेळ नव्हता. पण, मुख्यमंत्र्यांचा आदेश आणि तुमच्यावरचे प्रेम यामुळे मी आलो, असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.

‘सकाळ’ व ‘कॉफी टेबल बुक’ची प्रशंसा

‘सकाळ’सारख्या प्रमुख वर्तमानपत्राने आप्पांच्या कार्याविषयी कॉफी टेबल बुक काढले आहे. ज्यांनी समाजासाठी, मतदारसंघासाठी काहीतरी केलेले आहे, अशाच लोकांची कॉफी टेबल बुक एखादे वर्तमानपत्र काढू शकते. याच्यातच तुमचा विजय संपादन झालेला आहे, अशा पद्धतीचं बक्षीस मिळणे, सहज शक्य नाही.

अनेकजण स्मरणिका काढतात. कार्य अहवाल काढतात. पण, दैनिके त्यांची दखल घेतातच असे नाही, असे सांगून उदय सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्र तुमच्या कार्याची दखल घेऊन ‘संसदरत्न श्रीरंग आप्पा म्हणून पुस्तक काढतं, ही तुम्ही केलेल्या कामाची घेतलेली दखल आहे.

एका वृत्तपत्रानं एका राजकारण्याचे कॉफी टेबल बुक प्रकाशित केलंय, हा देखील योगायोग आहे. त्यामुळे ‘सकाळ’ला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की आमच्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याचा कार्य अहवाल आपण जनतेसमोर आणलाय. त्याचा अभ्यास करून भविष्यात अनेक राजकारणी तुमच्यासारखी कामे करतील. एवढी ताकद या पुस्तकामध्ये आहे.’

प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी केले. ‘सकाळ’च्या वाटचालीबाबत तसेच खासदार बारणे यांच्या कार्याच्या पुस्तकाबाबत भूमिका मांडली. कार्यक्रमास माजी महापौर आर. एस. कुमार, हनुमंत भोसले, योगेश बहल, माई ढोरे, अपर्णा डोके, नितीन काळजे, राहुल जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, बळिराम जाधव, नारायण बहिरवाडे, तुकाराम भोंडवे, चंद्रकांता सोनकांबळे, नाना काटे, शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, अमित गावडे, सुरेखा लांडगे, वैशाली काळभोर, ऊर्मिला काळभोर, शैलेश मोरे, सीमा सावळे, आशा शेडगे, सारंग कामतेकर, प्रमोद कुटे, शांताराम भालेकर, नीलेश बारणे, कैलास बारणे, प्रकाश मलशेट्टी, चेतन भुजबळ, विश्‍वजीत बारणे, मोरेश्‍वर शेडगे, बाळासाहेब भागवत, बाबा कांबळे, महेश बारणे, प्रताप बारणे, सरीता साने, रवी नामदे, बाळासाहेब वाल्हेकर, नीलेश तरस, प्रताप बारणे, शंकरराव शेलार, दिलीप पांढारकर आदि उपस्थित होते.

‘एनआयई’चे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले. जाहिरात विभागाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ यांनी आभार मानले.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची २००९ मध्ये पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा थेरगावला क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड आणि आप्पा यांनी पुढाकार घेतल्याने आणि वेळोवेळी सहकार्य केल्याने अकादमी साकार झाली. आज राज्यातील अव्वल अकादमींमध्ये थेरगावच्या अकादमीची गणना होते. अकादमीतील खेळाडू भारत ‘अ’, १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि आयपीएल खेळत आहेत. स्थानिक मुलांना खूप चांगले व्यासपीठ मिळाले आहे. मला आप्पा हे एम. एस. धोनीसारखे वाटतात. धोनी मैदानावर शांत, संयमी असतो. परंतु, त्याची खेळीही आक्रमक असते. तसे श्रीरंग आप्पा आहेत.

- दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार, भारतीय क्रिकेट संघ

आमचे काका हिरामण बारणे यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांची अनेक कामे आप्पा पाहात होते. त्यामुळे राजकारणामध्ये त्यांचा लोकांशी संपर्क वाढत गेला. थेरगाव परिसरामधून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली. त्यांचा आदर्श, त्यांचे स्थान आमच्या आयुष्यात सर्वात उंच आहे. लोकांसाठी दिवसाचे १२-१५ तास बाहेर राहात असले तरी घरच्यांसाठीही ते वेळ काढतात. ‘तुला आयुष्यात जे काही करायचंय ते तू कर’, असे आप्पांनी सांगितले. मी आयुष्यात क्रिकेट, गायन, फुटबॉल, अभिनय हे सगळं काही केलं. हे सगळ्यात आप्पा माझ्या मागे ठामपणे उभे राहिले. आप्पांच्या शिकवणीला मी कधीच तडा जाऊ देणार नाही, याची मी ग्वाही देतो.

- विश्‍वजित बारणे, आप्पांचे चिरंजीव व युवा सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे काम आपण पाहात आहोत. त्यांना पुन्हा खासदार करण्याची संधी आपण सर्वजण देणार आहोत. आप्पा अबोल आहेत. पण, काम खूप करतात. ते विकासाचे शिल्पकार नक्कीच आहेत, पण स्वभावानेही गुणी आहेत. त्यांच्या कामाचा व्याप खूप मोठा आहे. सर्वांशी ओळख असल्याने त्यांना काम करणे सोपे जाते.

- उषा ढोरे, माजी महापौर, पिंपरी चिंचवड

आप्पांशी माझी खूप जुनी मैत्री आहे. त्यांनी शून्यातून एक चांगली झेप घेतली आहे. राजकीय काम सांभाळून परिवार व मैत्री निभावली आहे. श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी दोनशे कोटी रुपयांची कामे त्यांच्या माध्यमातून झाली आहेत. छातीची ढाल करून ते आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. दोन कोटी ५१ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंदिरासाठी दिला आहे.

- बाळासाहेब काशीद, अध्यक्ष, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट

मी नगरसेवक झाल्यानंतर आप्पांबरोबर काम करण्याची संधी मला अनेक वर्षे मिळाली. त्यांची लोकसभेतील भाषणे अभ्यासपूर्ण असतात. महापालिका सभागृहातही ते अतिशय प्रभावी बोलायचे. त्यातून आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळायची, मार्गदर्शन मिळायचे. त्यांनी सभागृहात कधी विरोधाला विरोध केला नाही. कायम नगरसेवकांना मदत करायचे.

- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com