esakal | दप्तरावर यंदाही कोरोनाचं ‘ओझं’; स्कूल बॅग व्यवसाय ठप्पच
sakal

बोलून बातमी शोधा

School Bag

दप्तरावर यंदाही कोरोनाचं ‘ओझं’; स्कूल बॅग व्यवसाय ठप्पच

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - एरवी जून उजाडला, की बाजारात मुले (Child) आणि पालकांची (Parents) शालेय खरेदीची झुंबड उडते. बहुतांश सर्व विद्यार्थी (Student) दरवर्षी अथवा दोन वर्षांतून एकदा नवे दप्तर घेतात. मात्र, यंदा शाळेचाच भरवसा नसल्याने दप्तर (School Bag) खरेदी-विक्री व्यवसाय ठप्प आहे. त्यात मुलांचा अभ्यास घरूनच सुरू असल्याने दप्तर उद्योग व्यवसायाचा (Business) धागा ऐन सीझनमध्ये उसवलेला आहे. कोरोना कधी संपेल आणि शाळा कधी सुरू होणार? याकडे दप्तर विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे. (School Bag Business Decrease by Coronavirus)

शालेय साहित्याचा अविभाज्य भाग असणारा दप्तर व्यवसाय नेहमीच तेजीत असतो. प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी ऐपतीनुसार दप्तर घेतात. दप्तर विक्रीतून दरवर्षी हुकमी उत्पन्न मिळते. पण, आता शाळाच बंद असल्याने दप्तर कोण खरेदी करणार? असा प्रश्न पिंपरीमधील घाऊक विक्रेत्यांना सतावत आहे. संचारबंदीमुळे या व्यवसायाचे गणितच बिघडले आहे. विक्री होत नसल्याने खर्च केलेले पैसेही हातातून गेले आहेत. सगळे साहित्य रॅकवर धुळखात पडून आहे. यंदाही कोरोना संकट कायम असल्याने शाळा कधी सुरू होतील? याची प्रतीक्षा विक्रेत्यांना लागली आहे.

हेही वाचा: वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळ्यात कारवाई!

शाळांकडून ऑर्डर नाही

कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने लॉकडाउन, संचारबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाला. शाळा सुरू झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याची स्‍कूलबॅगला मागणी असते. विविध शाळांकडून स्‍कूल बॅगच्या ऑर्डरदेखील येतात. त्‍याप्रमाणे दप्तराचा पुरवठा केला जायचा. पण, गेल्या वर्षापासून एकाही शाळेकडून स्‍कूल बॅगची ऑर्डर आली नाही. सलग दोन वर्षांपासून मागणी नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुकानात दप्तर तसेच पडून असल्याचे विक्रेते योगेश तेजवानी यांनी सांगितले. उल्हासनगर, सुरत, दिल्लीमधून शहरात मोठ्या प्रमाणात बॅगा आणि दप्तरांचा पुरवठा केला जातो. शहरात घाऊक पद्धतीने त्यांची विक्री केली जाते. सुमारे एक हजार विक्रेते या व्यवसायात आहेत.

जूनमध्ये पाच कोटींपर्यंत उलाढाल

जूनमध्ये शालेय दप्तराच्या विक्रीतून सुमारे पाच कोटींपर्यंत उलाढाल होते. चायना मटेरियलपासून तयार झालेले दप्तर तकलादू असते, यामुळे मागील काही वर्षांपासून ब्रँडेड दप्तरांनाच मागणी वाढली आहे. ‘चार पैसे जास्त घ्या, पण ब्रँडेड दप्तर द्या’, अशी मागणी पालक करीत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. काही शाळा दप्तरांवर आपले नाव छापून घेतात. सुमारे ४०० ते तीन हजार रुपयांदरम्यान ब्रँडेड दप्तर विकले जातात. पण, गेल्या वर्षापासून दप्तर व्यवसाय बुडाला आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या व्यवसायाला कोरोनाचा मोठा फटका बसल्याचेही तेजवानी यांनी सांगितले.

loading image