उद्योगनगरीची सुरक्षा ‘यंग ब्रिगेड’च्या हाती - कृष्ण प्रकाश

krishna prakash
krishna prakash

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जोडीला तरुण वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सहायक पोलिस आयुक्त पदासह इतर वरिष्ठ अधिकारीपदी पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जोडीला तरुण वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज आली आहे. त्यामुळे आयुक्तालयाची कमान सध्या ‘यंग ब्रिगेड’कडे असल्याचे दिसून येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यासह घडलेल्या गुन्ह्याचा तातडीने तपास होऊ लागला आहे. मोका, तडीपार कारवायांचे प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर बारीक नजर ठेवली जात आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट २०१८ ला आयुक्तालय कार्यान्वित झाल्यापासून एखादा अपवाद वगळता सहायक आयुक्त पदावर पदोन्नतीने आलेल्या म्हणजेच सेवा निवृत्तीला आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याचे दिसून आले. मात्र, सध्या नऊ सहायक आयुक्तांपैकी पाच सहायक आयुक्त हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत सरळसेवा सहायक आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या २०१३ च्या बॅचचे अधिकारी आयुक्तालयात दाखल झाले आहेत. यामध्ये गणेश बिरादार, श्रीकांत डिसले, प्रेरणा कट्टे, सागर कवडे, प्रशांत अमृतकर यांचा समावेश आहे.

यासह परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे हे देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत सरळसेवा सहायक आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. तसेच भारतीय पोलिस सेवेतून आलेले मुख्यालयाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ हे २००७ च्या बॅचचे व परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर हे २००८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. हे तरुण अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे सध्या पिंपरी पोलिस दलात तरुण अधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. कामाचा उत्साह, तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन अंमलबजावणी, निर्णय क्षमता, तपासाच्या आधुनिक पद्धतीवर भर या बाबी तरुण अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत दिसून येतात. दरम्यान, सध्या पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश व अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम मार्गक्रमण करीत आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर 
सध्या पदोन्नतीने आलेले चार सहायक आयुक्त कार्यरत आहेत. यात संजय नाईक-पाटील, नंदकिशोर भोसले, रामचंद्र जाधव, नंदकुमार पिंजण यांचा समावेश आहे. यापैकी येत्या सहा महिन्यात जाधव व पिंजण हे निवृत्त होणार आहेत.

प्रदीर्घ सेवेचा अनुभव 
पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रदीर्घ सेवेचा अनुभव असतो. हा अनुभव तरुण अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो. दरम्यान, सरळसेवा सहायक आयुक्तपदी नियुक्ती झालेले अधिकारी व पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून अधिक चांगले काम होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com