पिंपरी-चिंचवडकरांनो, सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांना भेटा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

  • डॉ. पवन साळवे यांचे नागरिकांना आवाहन 

पिंपरी : 'पावसामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो,' असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर 'कोणत्याही कारणामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तपासणी करून घ्यावी,' असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवडकर म्हणतायेत, 'पाणी ओसरलं, पण दुर्गंधीचं काय?' 

'सकाळ'शी बोलताना डॉ. साळवे म्हणाले, "पावसात भिजल्यामुळे सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. अशा वेळी मी पावसात भिजलो, त्यामुळे सर्दी झाली, असा विचार करून कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. महापालिकेच्या नजीकच्या दवाखान्यात जाऊन डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी. औषधे घ्यावीत. कोणताही आजार अंगावर काढू नये.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

औषधे घेऊनही लक्षणे कमी होत नसल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अँटिजेन टेस्ट करून घ्यावी. ती निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर अर्थात स्वॅब देऊन कोविडची तपासणी करून घ्यावी. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी, सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे जाईपर्यंत घरातून बाहेर पडू नये. घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यापासून लांब राहावे. मास्कचा नियमित वापर करावा. वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: see a doctor if you have any symptoms of cold or cough pimpri chinchwad