कौतुकास्पद : लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून ते गरजूंसाठी करतायेत हे मोठं काम

रमेश मोरे
गुरुवार, 30 जुलै 2020

लॉकडाउनच्या पहिल्याच दिवसापासून गरजूंसाठी शिवभोजनाची व्यवस्था करण्यात आली.

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : कोरोनामुळे कष्टकरी, मजूर, भाड्याने राहणारा वर्ग पुरता पिचला गेला. लॉकडाउनमुळे हातचं काम गेलं. जवळचे पैसेही संपले. घर चालवणं कठीण झालं, अशा काळात मदत करणाऱ्या हातांचा या सर्वांना मोठा आधार ठरला.

कधी गॅस संपलेला, पैसे नाहीत म्हणून उपासमार, घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायट्यांनी नाकारलेला प्रवेश, यामुळे अनेक कुटुंबांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. जेमतेम चालणाऱ्या फ्लॅट संस्कृतीत भाड्याने राहणाऱ्या लोकांचाही यात कोंडमारा झाला. मदतीसाठी हात कसा पसरायचा, हा संकोच मनात घेऊन या काळात अनेकांची फरपट झाली. त्यातच जुनी सांगवी परिसरात सुरुवातीपासून एक आशादायक चित्र दिसले, ते लॉकडाउनच्या पहिल्याच दिवसापासून गरजूंसाठी शिवभोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचे रोजचे पाच रुपये परस्पर भरण्यात येऊन गरजूंपर्यंत मोफत जेवण पुरविण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीम वर्क...

ज्यांना रांगेत येऊन स्वाभिमान दुखावला जातोय ही भावना निर्माण झाली, अशा सर्व कुटुंबांची माहिती काढून या कामातील स्वयंसेवकाच्या मदतीने त्यांना त्या त्या भागात जाऊन आजपर्यंत जेवण पुरविण्यात आले.

सुरक्षेची घेतली काळजी...

रोज दीडशे गरजूंना सकाळ व संध्याकाळ रांगेत एकत्र आणणे धोकादायक ठरेल. हे कारण लक्षात घेऊन येथील मुळानगर, प्रियदर्शनी नगर, ममतानगर आदी त्या-त्या भागात जागेवरच पंधरा-पंधरा लोकांसाठी वाटप केंद्र सुरू करण्यात आले. या सेवाकार्यात 'आरंभ' नावाची टीम तयार करून रोज एकूण पन्नास जण काम करत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन सा सेवाभावी ग्रुपकडून नावाप्रमाणेच काम केल्याची पावती समाजाकडून मिळत आहे. मात्र, हे आमचे कर्तव्य आहे, असे या टीमकडून सांगण्यात आले. सांघिक कामाच्या नियोजनातून गरजूंच्या जेवणासाठी आजवर या टीमने लॉकडाउनच्या काळात पहिल्या दिवसापासून आजवर रोज दीडशे जणांचे प्रत्येकी पाच रुपये याप्रमाणे नव्वद हजार रुपये भरले आहेत.

फिनिक्सचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित बाराथे, निमिष कांबळे, राहूल विधाटे, रविंद्र यादव, वसंत कांबळे, सुधीर शिंदे, सोमनाथ चव्हाण आदींनी योगदान दिले. या आशादायी उपक्रमाचे नागरिकांमधून कौतूक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv bhojan for needy people by phoenix social organization in juni sangavi