कुत्र्यांचा कहर; हिंजवडीत एकाच वेळी सहा कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

हिंजवडीमधील दुसरी घटना आहे. 

पिंपरी : रात्रीची वेळ होती. साधारपणे साडेदहा वाजले होते. पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करताना अचानकपणे मोकाट कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला. एकावेळी सहा कुत्र्यांनी अक्षरश: माझे लचके तोडले. मला फरफटत नेले. मी जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे तिथे असलेल्या सुरक्षारक्षकाने काठी घेऊन धाव घेतली आणि माझी सुटका झाली. हिंजवडी-मेगापॉलिस सॅंग्रिया सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षीय निधी पाल स्वत:वर ओढवलेला प्रसंग कथन करत होत्या. कोरोना पाठोपाठ आणखी एक मोठे संकट पिंपरी-चिंचवडकरांच्या मागे लागले आहे. एका तरुणीवर कुत्र्यांच्या घोळक्‍याने हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हिंजवडीमधील ही दुसरी घटना आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

पिंपरी-चिंचवड शहरासह हिंजवडी परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांची धास्ती घेतली आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी आठ व्यक्तींवर ही कुत्री हल्ले करून त्यांना जखमी करत आहे. यावरून ही समस्या किती गंभीर आहे, हे लक्षात येत आहे. विशेष म्हणजे, कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी रेबीजच्या लशीचाही तुटवडा असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कुत्र्यांच्या धास्तीमुळे मॉर्निंग वॉक करताना नागरिकांना हातात काठ्या घेऊन फिरावे लागते आहे. निधी पाल यांच्या शरीरावरील जखमा गंभीर आहे. त्यांच्या हाता-पायाचे लचके तोडले आहेत. हिंजवडी जिल्हा रुग्णालय कोविड असल्यामुळे येथील नागरिकांना औंध रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. तसेच, हिंजवडी परिसर ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येत असल्याने महापालिका या भागातील कुत्रे पकडत नाही किंवा निर्बिजीकरण करत नाही. त्यामुळे नेमके कोणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्‍न या परिसरातील नागरिकांसमोर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six dogs bites young woman at hinjewadi