वल्लभनगर आगाराचे सहा कर्मचारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus depo

वल्लभनगर आगाराचे सहा कर्मचारी निलंबित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, हे आंदोलन भडकले असून एसटी बस वाहतूक ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाने संपकरी कामगार-कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. आत्तापर्यंत वल्लभनगर आगारातील सहा जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. परंतु, नोटिसा कर्मचाऱ्यांच्या हातात न देता शिस्तभंगाची कारवाई केल्याप्रकरणी आगार फलकावर नोटीस लावण्यात आल्या आहेत.

एसटी महामंडळ विलिनीकरणाबाबत एसटीतील २८ कामगार संघटनांचे मत जाणून घेण्यासाठी, राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती कामगार संघटनांशी चर्चा करणार आहे. येत्या १२ आठवड्यांमध्ये ही समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार आहे. तर, एसटी कामगारांनी विलिनीकरणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: पिंपरी शहरातील ६०१ विद्यार्थ्यांनी दिली संपादणूक परीक्षा

सध्या एसटी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संपातून मागे हटणार नसल्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, थकीत वेतन, वेतन वाढ या मुद्यांवर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एसटी कामगारांनी सामान्य प्रवाशांना वेठीस धरू नये आणि कामावर परतण्याचे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे. त्याशिवाय त्यांनी कारवाईचाही इशारा दिला होता. त्यानुसार राज्यात केलेल्या कारवाईप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही ही निलंबनाची कारवाई केली आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संप फोडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकारकडून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सरकारने सुरू केली. सूडबुद्धीने झालेली कारवाई, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कारवाई केली तरी संप कायम राहणार आहे. आम्हाला मोजक्या जणांना निलंबित न करता सर्वांना करा अशी आमची मागणी आहे.’

- प्रवीण मोहिते, कर्मचारी

loading image
go to top