Punawale Village : भाजीपाला उत्पादक ते स्मार्ट पुनावळे; ‘आयटीयन्स’च्या पसंतीमुळे झपाट्याने विस्तार

पवना नदीच्या काठावरचे एक छोटेसे गाव पुनावळे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील एक उपनगर.
Punawale Old Wada
Punawale Old Wadasakal
Summary

पवना नदीच्या काठावरचे एक छोटेसे गाव पुनावळे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील एक उपनगर.

- बेलाजी पात्रे

पवना नदीच्या काठावरचे एक छोटेसे गाव पुनावळे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील एक उपनगर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बोरगे सरदारांचे वास्तव्य असलेले. त्यांचा बोरगे वाडा आजही ठाण मांडून इतिहासाची साक्ष देतोय. महंत श्री गगनगिरी महाराज यांचे वास्तव्य गावाला लाभले आहे. एका बाजूला जगप्रसिद्ध आयटी हब हिंजवडी आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग (मुंबई-बंगळूर महामार्ग) गावाच्या वाड्या-वस्त्यातून गेल्यामुळे दोन भागांत विभागले आहे. मुबलक पाण्यामुळे बागायती गाव अशी जुनी ओळख. अवघ्या २० वर्षांपूर्वी अस्सल ग्रामीण भागाचे दर्शन घडविणाऱ्या पुनावळे गावाचे अलीकडे संपूर्ण रूपडेच पालटले आहे. चेहरामोहरा बदलून गाव ते एक स्मार्ट उपनगर अशी नवी ओळख बनली आहे.

‘काळाचा महिमा काळच जाणे’ या उक्तीप्रमाणे पिढ्यान्पिढ्या विविध पिके पिकविणाऱ्या काळ्या भुईत आता गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. लहान-सहान दुकानांची जागा मॉल्स आणि स्मार्ट शॉपसने घेतली आहे. अल्पावधीत स्मार्ट झालेल्या पुनावळेतील रहिवाशांना शहरी आणि ग्रामीण बाज असा दोन्हीही जीवन शैलीचा अनुभव येतोय. आधुनिकतेबरोबरच गावाने सांप्रदाय, भजन-कीर्तन, यात्रा-उत्सवाची परंपरा मनापासून जपली आहे. त्यामुळे आजही पहाटे मंदिरातील काकड्याचे मंजूळ स्वर कानी पडतात. गावाचा १९९७ मध्ये महापालिकेत समावेश झाला. एका बाजूला तीस वर्षांपूर्वी हिंजवडीत आयटी पार्क अवतरले. मुंबई-बंगळूरू महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीमुळे आयटीयन्स वास्तव्य वाढले. परिणामी, अल्पावधीतच चहुबाजूंनी तारांकित गृहप्रकल्प अवतरले. उच्चभ्रू सोसायट्यांचे मोठे जाळे तयार झाले. मोठमोठे गृहप्रकल्प साकारत आहेत.

आधुनिकतेकडे प्रवास

मुबलक पाण्यामुळे भाजीपाला करणारे बागायती गाव ही खरी ओळख. पण, कालांतराने जवळच जगद्‍गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज साखर कारखाना झाल्याने शेतकरी उसाकडे वळला. त्याकाळी साखर कारखान्याला मुबलक ऊस पुरवठा अन् हिंजवडीकरांना-शेतीसाठी लिफ्टद्वारे पाणीही पुनावळे गावाने दिले. पिंपरी-चिंचवड मार्केटला एकेकाळी बैलगाडीतून ताजा व दर्जेदार भाजीपाला पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दारातील बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टर आणि आलिशान कारने घेतली आहे. पूर्वी मिसळ पावावर ताव मारणारी मंडळी आता पंचतारांकित हॉटेल्स व बँकव्हेटसमध्ये मोठं-मोठी शुभ कार्ये पार पाडत आहेत. तरुणांच्या परदेश वाऱ्यादेखील वाढल्यात. कौलारू टुमदार घरांचे आता प्रशस्त डौलदार बंगल्यात रुपांतर झाले आहे.

पुनावळे भागात जवळपास सातशेहून अधिक सोसायटी उभ्या राहिल्या आहेत. सुखसुविधा आल्या आहेत. या वाढत्या विकासासोबत ट्रॅफिक समस्या पण जाणवत आहे. लोकांना राहण्यासाठी प्रदूषण विरहित लोकेशन म्हणून पुनावळे एक उत्तम पर्याय आहे. ही सर्व विकास पाहता पुनावळेचा पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्यात खूप मोठा वाटा असेल.

- नवनाथ मेमाणे, अध्यक्ष, वर्धमान पामरोस सोसायटी, पुनावळे

महामार्ग, बीआरटी रोड, उच्चभ्रू सोसायट्या आणि अन्य बाबींमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. पूर्वी व आताच्या प्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. तेव्हा गावाचा बदल अविश्वसनीय वाटतो. तरुणांनी आधुनिकतेची कास धरली आहे. परंपरा जपत संधीचा फायदा घेत उद्योग, व्यवसायात स्थिरावले आहेत. हा कायापालट थक्क करणारा आहे.

- धनाजी कोयते-पाटील, अध्यक्ष, पुनावळे विविध कार्यकारी सोसायटी

विकास प्रकल्प

  • गावात शाळा आहे

  • सर्वसामान्यांना परवडणाऱ्या म्हाडाच्या घरकुल योजनेचे आरक्षण

  • गावाजवळ श्री संत तुकाराम महाराज पूल (बास्केट ब्रिज)

  • सांगवी-किवळे बीआरटी व सांगावडेमार्गे मावळात जायला रस्ता

इतिहासाच्या पाउलखुणा

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलातील सरदार बोरगे यांचा वाडा

  • १९७३ मध्ये संत गगनगिरी महाराजांनी पवना नदीत पाण्याखाली तपश्चर्या

  • गगनगिरी महाराज आश्रमासाठी बाबूराव भुजबळ यांनी सहा गुंठे जमीन दिली

  • संत सावता माळी महाराजांचे दोन मंदिरे आहेत

वैशिष्ट्ये

  • पुलामुळे रावेत-किवळे- आकुर्डीशी कनेक्टिव्हिटी वाढली

  • बारमाही पाणी असल्याने बागायती शेती, उदरनिर्वाहाचे साधन

  • पूर्वी भाजीपाला आणि फळे मुंबई पाठवणारे गाव, अशी ओळख

  • आषाढी वारीला मावळ प्रासादिक व कोंकण दिंडीचा गावात मुक्काम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com