सोमाटणे टोल नाक्‍यावर वाहनचालकांना कोंडीमुळे मनस्ताप

सोमाटणे टोल नाका : वाहनचालकांना रांगेत ताटकळत थांबणे सध्या नित्याचेच झाले आहे.
सोमाटणे टोल नाका : वाहनचालकांना रांगेत ताटकळत थांबणे सध्या नित्याचेच झाले आहे.

तळेगाव स्टेशन - मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्‍यावर फास्टॅग यंत्रणेतील तांत्रिक अडचणी आणि नियोजनाच्या अभावामुळे वाहनधारकांना टोल भरून मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. नित्याच्या कोंडीमुळे मावळसह बाहेरच्या वाहनधारकांना ताटकळत उभे राहावे लागते.

केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्रालयाने फास्टॅगसाठी एक जानेवारीला मुदतवाढ देत २६ जानेवारीची मुदत वाढवून दिली. यापूर्वी अनेक रंगीत तालमी झाल्या. मात्र, सोमाटणे टोलनाक्‍यावर अद्याप फास्टग यंत्रणेचा जम बसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी वाहनधारकांना बराच काळ ताटकळत थांबावे लागत असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा रोज पाहायला मिळत आहेत. फास्टॅग कार्डमध्ये बॅलन्स असूनही यंत्रणेतील पैसे कट न झाल्यास तसेच इतर कारणांसाठी वाहनधारकांना तासनतास थांबवून ठेवले जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकीकडे फास्टॅग यंत्रणेतील अनेक त्रुटी तांत्रिक अडचणी असल्यामुळे वाहनचालकांना कार्डवर बॅलन्स असूनही बऱ्याचदा पैसे कट होत नाहीत, असा आरोप चालकांकडून होतो आहे. पैसे कट झाले तरी यंत्रणेत अपडेट न झाल्याने पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. दुसरीकडे फास्टॅग यंत्रणेत कुठल्याही तांत्रिक अडचणी अथवा त्रुटी नसल्याचे टोलनाका व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना साधन व सुविधा विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भांडवलकर यांनी सोमाटणे टोलनाक्‍यावर होणारी वाहनधारकांची लूट आणि असुविधांबाबत मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आमदार शेळकेंनी फोडली कोंडी
देहूरोडकडून तळेगाव दिशेने आपल्या वाहनातून चाललेले आमदार सुनील शेळके यांना देखील सोमाटणे टोलनाक्‍यावरील कोंडीमुळे ताटकळत थांबावे लागले. अखेर वैतागून त्यांनी उलट्या दिशेने वाहन घालून टोलनाक्‍यावर उतरून बॅरियर गेट स्वतःच्या हाताने खुले करीत वाहने सोडून कोंडी फोडली. आमदार शेळके यांच्या पावित्र्याने टोलनाका कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सोमाटणे टोलनाक्‍याचा विषय पुन्हा एकदा प्रकर्षाने चर्चेत आला आहे. 

गाडीला फास्टॅग लावूनही कार्डवर बॅलन्स दाखवीत नसल्याने बराच वेळ ताटकळत थांबावे लागले. यंत्रणा खराब असल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. यंत्रणेत सुधारणा होणे गरजेचे आहे.
- अमर शिंदे, कंपनी बसचालक, चाकण एमआयडीसी

सध्या ऊसतोडणीचा हंगाम असल्याने उसाच्या डबल ट्रॉली तसेच ट्रक संथ गतीने चालतात. लोकल बंद असल्याने प्रवासी चारचाकी वाहने जास्त वापरतात. लॉकडाउननंतर सूट मिळाल्यानेही लोक वाहने घेऊन घराबाहेर पडतात. सरकारने इशारा देऊनही केवळ पन्नास टक्के वाहनधारकांनीच फास्टॅग लावले आहेत. त्यामुळे साहजिकच कोंडी होणे क्रमप्राप्त आहे.
- महादेव तुपारे, व्यवस्थापक, आयआरबी, सोमाटणे 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com