पिंपरी-चिंचवडमधील थुंकीबहाद्दरांना आवरा

सुवर्णा नवले
Monday, 28 September 2020

दंडाची रक्कम वाढवूनही परिस्थिती 'जैसे थे'; ठोस कारवाईची मागणी 

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला मनाई आहे. मात्र, याकडे थुंकीबहाद्दर दुर्लक्ष करीत आहेत. थुंकणाऱ्यांसाठी सुरुवातीला दीडशे रुपयांचा दंड लागू केला. त्यानंतर पाचशे रुपये आणि आता हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम वाढवूनही ते जुमानत नसल्याची वस्तुस्थिती आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजकीय 'बॉम्ब'

थुंकणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने महापालिकेने 25 तारखेपासून हजार रुपये दंड वसुलीला सुरुवात केली आहे. एप्रिलपासून दीडशे व पाचशे रुपये दंडाची रक्कम भरण्यास नागरिक टाळाटाळ करत होते. त्यामुळे या दंडाच्या रकमेला नागरिक दाद देतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरात ठिकठिकाणी असलेल्या पानटपऱ्यांवर तंबाखू, पान व गुटखा खाऊन थुंकणाऱ्याची संख्या अधिक आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. काही सुज्ञ नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, भांडणाचे प्रकार घडत आहेत. निगडीतील टिळक चौकात कारवाईदरम्यान असाच प्रकार घडला. पोलिस दंडाची रक्कम वसूल करताना थुंकीबहाद्दर चकवा देत पोलिसांच्या पायावर गाडी चालवून पळाला. 

काय म्हणतात थुंकीबहाद्दर? 

"चार महिन्यांपासून नोकरी नाही. व्यवसायाचे हाल सुरू आहेत. खिशात दमडी नाही. व्यसन लगेच सुटते का? त्यामुळे नकळतपणे तोंडातून पिचकारी जाते. दंड कोठून भरू? आम्ही हातापाया पडतो. आम्हाला सोडून द्या,'' अशी उत्तरे आरोग्य निरीक्षकांना मिळत आहेत. 

आरोग्य निरीक्षक म्हणतात... 

'अ' प्रभागातील आरोग्य निरीक्षक बापू गायकवाड म्हणाले, ""दंडाची रक्कम वसूल करताना नाकीनऊ येत आहे. एका प्रभागात 40 हजार लोकसंख्या आहे. दीडशे रुपये दंडाची रक्कम असतानाही नागरिक भरत नव्हते. एक हजार रुपये दंड वसूल करणे अवघड आहे. नागरिकांना गांभीर्य हवे. स्वतः:च्या कुटुंबाप्रमाणे विचार केल्यास शहर स्वच्छ राहू शकते. काहींच्या तोंडाला मास्क देखील नसतो. या वागण्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. मास्क न घालणाऱ्यांना आम्ही मास्कही पुरवतो. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.'' 

कारवाईची गरज कोठे? 

शहरातील मुख्य चौक, सिग्नल, शासकीय व खासगी कार्यालये, किराणा दुकाने, पानटपरी आणि गुटखा व तंबाखू विक्रीच्या जागी. 

थुंकीबहाद्दरांवर केलेली कारवाई (23 एप्रिलपासून 27 सप्टेंबरपर्यंत) 
व्यक्ती......दंडाची रक्कम 
5224.......7,84,650 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spitting increased in pimpri chinchwad